नफेखोरी करणाऱ्या मुंबईतील खाजगी रुग्णालयांवर कारवाई करा


पालकमंत्री अस्लम शेख यांचे मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र


मुंबई : राज्य शासनाने दि. ३० एप्रिल २०२० रोजी जाहीर केलेल्या अधिसूचनेद्वारा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खाजगी रुग्णालयांना कोरोना व अन्य आजारांवरील उपचारांसाठी किती शुल्क आकारावे हे ठरवून दिलेले असताना काही रुग्णालयांकडून अवाजवी शुल्क आकारणी चालू असल्याने अशा रुग्णालयांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी बृहन्मुंबई पालिका आयुक्तांना दिले आहेत.


श्री. शेख यांनी पत्रात लिहिलय, लोकहिताचा विचार करुन शासनाने ३० एप्रिल २०२० रोजीच्या अधिसूचनेद्वारे रुग्णालयांना मार्गदर्शक तत्त्वे आखून दिलेली असताना काही रुग्णालये शासनाच्या अधिसूचनेकडे दुर्लक्ष करत त्याला केराची टोपली दाखवत आहेत. दिवसेंदिवस अशा स्वरुपाच्या तक्रारींमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे नफेखोरी करणाऱ्या या रुग्णालयांवर कठोर कारवाई होण्याची गरज आहे.


खाजगी रुग्णालयांकडून बिलासाठी मृत रुग्णांचे पार्थिव अडविण्यात येऊ नये, रुग्णालयाचे दर वेबसाईटवर व रुग्णालयांमध्ये दर्शनी भागात प्रदर्शित करण्यात यावेत, रुग्ण हक्क व जबाबदाऱ्यांची सनद दर्शनी भागात प्रदर्शित करण्यात यावी व खाजगी रुग्णालयांना  राज्य शासनाने विहित केलेल्या दरांचे पालन करण्याची हमी देण्याबाबत रुग्णालयांना सूचित करण्यात यावे, असे निर्देश श्री. शेख यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहेत.