राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या यशस्वी अंमलबजावणी प्रति बांधिलकी व्यक्त करत अभ्यागतांची परिषद संपन्न


नवी दिल्‍ली : राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या यशस्वी अंमलबजावणीच्या वचनबद्धतेसह अभ्यागतांची परिषद संपन्न झाली. तत्पूर्वी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज ‘उच्च शिक्षणात एनईपी 2020 च्या अंमलबजावणीबाबत  अभ्यागतांची परिषद’ च्या व्हर्च्युअल उद्घाटन सत्राला संबोधित केले.


शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’; शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे,  उच्च शिक्षण सचिव अमित खरे, एनईपीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. के.कस्तुरीरंगन, यूजीसीचे अध्यक्ष डी.पी.सिंग, केंद्रीय विद्यापीठांचे कुलगुरू, आयआयटीचे, एनआयटी, आयआयआयटी, एनआयडी, आयआयएसईआर, एसपीए आणि राष्ट्रीय महत्व असलेल्या इतर संस्थाचे  संचालक यावेळी उपस्थित होते.


सत्राच्या समारोप प्रसंगी पोखरियाल म्हणाले की सरकारी अनुदानित उच्च शिक्षण संस्था ज्ञान निर्मिती आणि प्रसार यांचे महत्त्वपूर्ण व्यासपीठ आहेत आणि म्हणूनच ते एनईपी  2020 मध्ये महत्वाची भूमिका बजावतात आणि केंद्रीय विद्यापीठे आणि राष्ट्रीय महत्वाच्या संस्थेच्या प्रमुखांना एनईपी अमलबजावणीसंबंधी विविध बाबींवर विस्तृत चर्चा करण्याची संधी देतात. ते पुढे म्हणाले की, परिषदेने एनईपी  2020 च्या  विविध पैलूंबाबत आणि तातडीने सुधारणांची आवश्यकता असलेल्या उच्च शिक्षणाच्या महत्त्वाच्या क्षेत्रांना प्राधान्य देऊन टप्प्याटप्प्याने प्रभावी अंमलबजावणीची रणनीती आणि कृती आराखड्यासाठी करायच्या उपायांबाबत चर्चा केली.


शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी अभ्यागत परिषदेतील समृद्ध चर्चा महत्त्वपूर्ण असल्याचे सांगत यामुळे  राष्ट्रीय शिक्षण धोरण प्रभावीपणे राबवण्यात मदत होईल अशी आशा व्यक्त केली . धोत्रे यांनी परिषदेत सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानले.


अध्यक्ष, प्रा. के. कस्तुरीरंगन यांनी 21 व्या शतकाच्या कौशल्यांना जोड देण्याची आणि सर्वाना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याची गरज अधोरेखित केली. त्यांनी शैक्षणिक सुधारणा, 4-वर्षाचा  पदवी अभ्यासक्रम, बहु-शाखीय आणि समग्र शिक्षण आणि शुद्ध आणि उपयोजित परिवर्तनात्मक संशोधन यावर धोरणाचा भर असल्याचे नमूद केले.  तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देताना प्रा. कस्तुरीरंगन म्हणाले, तंत्रज्ञान केवळ एकूण नोंदणी प्रमाण वाढवण्यास मदत करत नाही तर आज आपण ज्या अडथळ्यांना सामोरे जात आहोत त्याबाबत  आपला प्रतिसाद देखील सुधारतात. प्रा. कस्तुरीरंगन  यांनी संस्थांच्या एकत्रीकरणाद्वारे  संसाधनांच्या विभाजनाचे  महत्त्व देखील अधोरेखित केले. आपली  आंतरविद्यापीठ केंद्रे आपल्या विद्यापीठांदरम्यान  संसाधनांचे सामायिकरण करण्याचे चांगले उदाहरण आहेत असे ते म्हणाले. आपल्या उच्च शैक्षणिक संस्था, संस्थांची  पुनर्रचना, शिक्षण क्षेत्रातील प्रख्यात सेवानिवृत्त शिक्षकांच्या मदतीने राष्ट्रीय मार्गदर्शक घडवणे,  सांस्कृतिक परिवर्तन आणि आपल्या उच्च शैक्षणिक संस्थांचा दृष्टीकोन बदल करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.


एनआयटी त्रिचीचे संचालक प्रा.  मिनी शाजी थॉमस यांनी “उच्च शिक्षणात संशोधन, नावीन्य आणि डिजिटल परिवर्तन” या संकल्पनेवर  सादरीकरण केले आणि प्रत्येक संस्थेत अंतर्गत संसाधनांच्या मदतीने उत्कृष्टता केंद्रे आणि मध्यवर्ती सुविधा तयार करता येतील हे अधोरेखित केले.  त्या म्हणाल्या, सर्वांसाठी इंटर्नशिप सक्तीची करून विद्यार्थ्यांना ग्राहकांची गरज समजून घ्यायला अनुमती देऊन त्यांच्या कल्पनाशक्तीला प्रोत्साहन दिले पाहिजे. एकूण नोंदणी प्रमाण वाढविण्यात उच्च शिक्षणात डिजिटल परिवर्तनाची भूमिका त्यांनी अधोरेखित केली. सादरीकरणा बाबत त्या म्हणाल्या,  डिजिटल तंत्रज्ञानाच्या प्रभावी संक्रमणासाठी संस्थात्मक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांची सज्जता  आणि सुसज्ज लायब्ररी महत्त्वपूर्ण आहे.


तिसरे सत्र होते “व्यापकता आणि उत्कृष्टतेसाठी समानता, समावेश आणि क्षमता निर्मिती”. जामिया मिलियाच्या कुलगुरू प्रा. नजमा अख्तर यांनी आपल्या सादरीकरणात समानता, समावेश व क्षमता निर्मितीद्वारे संस्थात्मक व्याप्ती आणि उत्कृष्टता प्राप्त करता येते यावर भर दिला. त्या म्हणाल्या, की सरकारने तरुणांना शैक्षणिक संधी, रोजगाराच्या संभाव्य संधी आणि सरकारकडून  पुरविल्या जाणार्‍या मदत यंत्रणेची माहिती देणे ही काळाची गरज आहे.


त्यानंतरचे सत्र ‘भारतीय ज्ञान प्रणाली, भाषा, संस्कृती आणि मूल्ये’ या विषयावर होते. प्रा. बी. मुरलीधर शर्मा, कुलगुरू, राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ, तिरुपती यावेळी म्हणाले की, महाविद्यालयीन शिक्षणापासून ते संशोधन स्तरावरील कार्यक्रमांपर्यंत, सर्वत्र 21 व्या शतकाच्या जागतिक गरजा पूर्ण करण्यासाठी उत्सुक सहभागासह भारतीय वैज्ञानिक ठेवा आणि वारसाच्या प्रासंगिकतेचे अनावरण आवश्यक आहे.  ते म्हणाले की या ज्ञान प्रणाली  खेडे व शहरे यांना जोडणारी पर्यावरण संरक्षक  उपग्रह टाउनशिप,पर्यावरणाचा समतोल राखणे, नदी व्यवस्थेचे शुद्धीकरण  यासारख्या संशोधनाच्या बाबीं उपलब्ध करू शकतात , यातून  शांततापूर्ण सह अस्तित्व निर्माण होऊ शकते आणि उच्च मूल्यांचे रक्षण केले जाऊ शकते.


आयआयआयटी गुवाहाटीचे संचालक प्रा. गौतम बरुआ यांनी “आंतरराष्ट्रीयकरण आणि जागतिक क्रमवारी” यावर अंतिम सादरीकरण केले. प्रा. बरुआ यांनी भारतातील परदेशी विद्यार्थ्यांची वाढत्या संख्येची आव्हाने नमूद केली. ते म्हणाले, परदेशातील पदव्युत्तर आणि पीएचडी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यावर अधिक भर दिला जाईल. एआयसीटीईचे अध्यक्ष प्रा. अनिल सहस्र्बुद्धे यांनी असे नमूद केले की परदेशी विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता सारख्या आधुनिक विषयांवर भर देण्याबरोबरच इंडोलॉजीसारख्या पारंपारिक विषयांचा विस्तार करण्याची गरज आहे. परदेशातून प्राध्यापकांची भरती, परीक्षेच्या पद्धतीत बदल करणे, परदेशी विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी संयुक्त पोर्टल तयार करणे, परदेशी विद्यार्थ्यांना भारतात आकर्षित करण्यासाठी परदेशात शिक्षण मेळावे आयोजित करणे यावर आपण भर दिला पाहिजे, अशी सूचना त्यांनी केली. प्रा. सहस्रबुद्धे यांनी आंतरराष्ट्रीय क्रमवारीचे मापदंड भारताला अनुकूल नाहीत हे लक्षात घेऊन क्रमवारीच्या पैलूंवर काम करण्याची गरज यावरही भर दिला.