भारत आणि चीनदरम्यान 5 मुद्द्यांवर एकमत


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रत्यक्ष ताबा रेषेवरील परिस्थितीबाबत भूमिका निश्चित करण्यासाठी भारत आणि चीनदरम्यान 5 मुद्द्यांवर एकमत झालं आहे. शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीसाठी रशिया दौऱ्यावर असलेले परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी काल रात्री चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांची स्वतंत्रपणे भेट घेतली.

सीमेवरील तणाव कमी करण्यावर आणि लवकरात लवकर सैन्य माघारी घेण्याचं यावेळी मान्य करण्यात आलं. सध्याची तणावाची परिस्थिती दोन्ही देशांच्या हिताची नसून सीमेवरील सैन्यानं एकमेकांशी संवाद कायम ठेवावा आणि योग्य अंतरावर तैनात रहावं, असंही यावेळी मान्य करण्यात आलं. वादाचं रुपांतर भांडणात होऊ नये, याची दोन्ही देशांनी काळजी घ्यावी, त्यासाठी दोन देशांमध्ये वेळोवेळी झालेल्या बैठकीत एकमतानं मान्य झालेल्या मुद्द्यांचा परामर्श घ्यावा, असं जयशंकर आणि वँग यी यांच्यातील चर्चेत मान्य करण्यात आलं. 


दरम्यान रशिया दौऱ्यावर असलेले परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जी लाव्हरोव्ह आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांच्यात काल बैठक झाली. रशिया-भारत-चीन त्रिस्तरीय सहकार्य वाढवण्याबाबत यावेळी मतप्रदर्शन करण्यात आले. जागतिक विकास, शांतता आणि स्थैर्यासाठी तिन्ही देशांनी एकत्र विकास आणि सहकार्य करणं आवश्यक असल्याचं यावेळी मान्य करण्यात आलं.