एक ऑक्टोबरपासून हमीभावाने मूग खरेदी शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांचे आवाहन


मुंबई : राज्यात दि. 1 ऑक्टोबर 2020 पासून मूग खरेदीला सुरवात होणार असून  ही खरेदी प्रक्रिया पुढे 90 दिवस सुरू राहणार आहे, राज्यात 181 खरेदी केंद्र सुरु करण्यात आली आहेत, असे पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.


हमीभावाने मूग खरेदीच्या मान्यतेचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे दि.31 ऑगस्ट 2020 ला पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला केंद्र शासनाची मान्यता मिळाली असून दि. 15 सप्टेंबरपासून मूग खरेदीसाठीची नोंदणी सुरु झाली आहे. आतापर्यंत 230 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.


सुरु करण्यात आलेल्या मूग खरेदी केंद्रामध्ये विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे-29, मार्केटिंग फेडरेशनचे 105 व महाएफपीसीचे 47 असे एकूण 181 खरेदी केंद्र सुरू आहेत. शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर नोंदणी करावी, असे आवाहन पणनमंत्री श्री.पाटील यांनी केले.


नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना नोंदणीच्या क्रमवारीनुसार मूग खरेदी केंद्रावर आणण्यासाठी एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे. ज्या केंद्रावर नोंदणी केली आहे त्याच केंद्रावर एसएमएस आल्यानंतर शेतकऱ्यांनी शेतमाल घेऊन यावा.


हंगाम 20-21 मधील किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत मूग हमी भाव 7 हजार 196 असा जाहीर केला आहे. सर्व खरेदी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे असेही श्री.पाटील यांनी सांगितले.