प्रत्येक गावातील पायाभूत सुविधा हाच विकासाचा मंत्र असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील प्रत्येक गावाला शहराप्रमाणेच सुविधा मिळाव्यात यासाठी आपलं सरकार प्रथमपासूनच प्रयत्नशील असून पायाभूत सुविधा निर्मितीसाठी सातत्यानं मोठी तरतूद करण्यात येत आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ज्या देशातील लहानमोठ्या गावांमध्ये पायाभूत सुविधांचा विकास झालेला असतो तोच देश खऱ्या अर्थानं प्रगती करतो, हेच इतिहासातून वारंवार दिसून आलं आहे.

म्हणूनच विविध प्रकल्पांद्वारे रस्ते, महामार्ग, इंटरनेट सुविधा यांद्वारे गावं जोडण्याचं महत्त्वपूर्ण काम केलं जात असल्याचं मोदी यांनी सांगितलं. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, मुख्यमंत्री नितीशकुमार यामध्ये सहभागी झाले होते.


मोदी यांच्या हस्ते आज बिहार राज्यातल्या 14 हजार 258 कोटी रुपये खर्चाच्या महत्त्वाकांक्षी नऊ महामार्ग प्रकल्पांचा कोनशिला अनावरण समारंभ दुरदृश्य प्रणालीद्वारे सध्या सुरु आहे. त्यामध्ये मोदी यांनी हे प्रतिपादन केलं.

या महामार्गांमुळे रस्ते वाहतूक आणि मालवाहतुकीची सुविधामध्ये सुधारणा होईल. या कार्यक्रमात तीन मोठ्या पुलांच उद्घाटन आणि ऑपटीकल फायबर इंटरनेट सेवेचही उद्घाटन करण्यात आलं. यामुळे बिहार राज्यातल्या 45 हजार 945 गावातल्या प्राथमिक शाळा, अंगणवाड्या, आशा सेविका आणि जीविका दीदींना डिजिटल सेवांचा लाभ होणार आहे.

2015 मध्येच बिहारच्या पायाभूत सुविधांच्या विकासकामासाठी 54 हजार 700 कोटी रुपयांच्या 75 प्रकल्पाना मंजुरी मिळाली असून त्यापैकी 13 प्रकल्प पूर्ण झाले आहेत.