राजपत्रित अधिकारी महासंघाच्या मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांच्याकडे सुपूर्द


पुणे : कोरोना संसर्गाच्या परिस्थितीत अधिकाऱ्यांची 100 टक्के उपस्थिती करु नये, या मागणीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यासाठीचे निवेदन आज राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पुणे जिल्हा समन्वय समितीच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.


यावेळी महासंघाचे राज्य सरचिटणीस विनायक लहाडे, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ.जयश्री कटारे, सरचिटणीस विठ्ठल वाघमारे, विभागीय सहसचिव आर. टी. चव्हाण, माहिती सचिव तथा जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, माहिती सचिव तथा माहिती अधिकारी वृषाली पाटील, सदस्य तथा शाखा अभियंता मनोहर खाडे, तहसीलदार विवेक जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.


कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांची कार्यालयीन उपस्थिती 100 टक्के करु नये, अधिकारी, कर्मचाऱ्यांना आरोग्य सुविधा द्याव्यात, 50 लाख रुपयांचा विमा मंजूर करावा, करोना संसर्ग तातडीचा/ आकस्मिक आजार घोषित करुन त्याच्या संपूर्ण वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती द्यावी तसेच विलगीकरण/ अलगीकरणासाठी स्वतंत्र रजा मंजूर करावी आदी मागण्यांसाठी राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतीने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात आज निवेदन देण्यात आले. पुण्यात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे यांनी निवेदन स्वीकारले.