गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय आता ‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपूर’ म्हणून ओळखले जाणार
• महेश आनंदा लोंढे
मुंबई : नागपूरस्थित गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयाचे नामकरण ‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपूर’ असे करण्यात आले आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला असल्याची माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली .
नागपूरजवळ गोरेवाडा येथे आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान साकारण्यात येत असून त्या ठिकाणी जनतेला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने प्रकल्प आराखडा बनविण्यात आला आहे. गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान हे व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र वनविकास महामंडळ, नागपूर यांच्या अखत्यारित असून तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सफारी व सुविधा उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही सुरु आहे.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 26 जानेवारी रोजी भारतीय सफारीचे उद्घाटन
गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान हे वैविध्यपूर्ण असून त्यामधील भारतीय सफारीचे काम पूर्ण झाले आहे. ही सफारी 26 जानेवारी रोजी मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जनतेसाठी खुली केली जाणार आहे. या भारतीय सफारीमध्ये व्याघ्र सफारी, बिबट सफारी, अस्वल सफारी, तृणभक्षी प्राणी सफारी कार्यान्वित करण्यासाठी प्राण्यांचे स्थलांतरणसुद्धा करण्यात आलेले आहे. भारतीय सफारीचे उद्घाटन झाल्यानंतर 40 आसन क्षमतेची 3 विशेष वाहने व ऑनलाईन तिकीट बुकींग सुविधा जनतेसाठी उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
2 हजार हेक्टर वन क्षेत्रावर उभारणी
जवळपास 2 हजार हेक्टर वन क्षेत्रावर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणी उद्यान साकारण्यात येत असून यामधील महत्त्वाची कामे महाराष्ट्र वनविकास महामंडळ, नागपूर यांचेकडून पूर्ण करण्यात आलेली आहेत.
उद्यानातील सुविधा
नागपूर शहराच्या मध्यापासून गोरेवाडा हे ठिकाण फक्त 6 किलोमीटर असून भविष्यात हे एक महत्त्वाचे व मोठे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचा शासनाचा मानस आहे. हा प्रकल्प नागपूर शहरास लागून असल्याने या प्रकल्पामुळे या भागात निसर्ग पर्यटनाला चालना मिळेल व रोजगाराच्या संधीसुद्धा उपलब्ध होणार आहेत. वन्यजीव संवर्धन, संशोधन व शिक्षण तसेच वन्यजीवांचे पुनर्वसन याबाबतचे कामही या आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानात केले जाणार आहे. प्राणी उद्यानात ये-जा करणाऱ्या पर्यटकांकरिता पार्किंग, प्रसाधनगृह, पिण्याचे पाणी, वाहने इत्यादी सुविधा करण्यात आलेल्या आहेत, अशीही माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.