आचार्य विनोबा भावे यांच्या १२६ व्या जयंती निमित्त प्रधानमंत्री, मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांचं अभिवादन
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आचार्च विनोबा भावे यांची आज १२६वी जयंती आहे. त्यानिमीत्त देशभरातून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. आचार्य विनोबा भावे यांच्या जयंतीनिमीत्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. विनोबा भावे यांनी स्वातंत्र्योत्तर काळात महात्मा गांधी यांचे विचार पुढे नेण्याचं महान कार्य केलं, शोषित आणि गरीबांना चांगलं आयुष्य मिळावं यासाठी त्यांनी मोठी चळवळ उभारली असं प्रधानमंत्र्यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. विनोबा भावे कायमच अस्पृश्यतेविरोधात लढा देत आले, त्यांचा अहिंसेवर आणि मूलभूत कार्य करण्यावर दृढ विश्वास होता असं महात्मा गांधी यांनी विनोबा भावे यांच्याबद्दल म्हटलं असल्याची आठवणही प्रधानमंत्र्यांनी ट्विटरवरून केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आचार्य विनोबा भावे यांच्या जयंतीनिमीत्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. विनोबा भावे हे महान संत, कृतिशील विचारवंत आणि समाजसुधारक होते, त्यांचं कार्य आणि विचार भावी पिढीपर्यंत पोहोचवणं हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. विनोबा भावे यांच्या जयंतीनिमीत्त राज्यातही अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. रायगड जिल्ह्यात गागोदे या त्यांच्या जन्मगावी, विनोबा जन्मस्थान प्रतिष्ठान इथं त्यांना पुष्पांजली अर्पण केली गेली. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या इतर उपक्रमांची माहिती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा नीला आपटे यांनी दिली. पवनार आश्रम इथं विनोबांचे शिष्य बलभाई यांनी अनुयायांसह विनोबा भावे यांना आदरांजली वाहिली. वर्धा इथल्या मगन संग्रहालयात सायकल रॅलीचंही आयोजन केलं आहे.
फिल्म्स डिव्हीजन राष्ट्रीय संत विनोबा भावे यांना त्यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त एक आगळी श्रद्धांजली अर्पण करणार आहे. फिल्म्स डिव्हीजनच्या संकेतस्थळावर आणि त्यांच्या युट्युब चॅनेलवर विनोबा भावे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे. ४७ मिनिटांच्या या माहितीपटाचं दिग्दर्शन विश्राम बेडेकर यांनी केलं आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.