प्रयोगात्मक कला क्षेत्रातील कलाकार करणार कोविडबाबत जाणीव जागृती; सांस्कृतिक कार्य विभागाचा शासन निर्णय
• महेश आनंदा लोंढे
मुंबई : राज्यातील कोविड संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनामार्फत विविध उपाययोजना गेल्या दीड वर्षापासून हाती घेण्यात आल्या आहेत. आता कोविड संसर्ग रोखण्यासाठी घ्यावयाची काळजी, तसेच लसीकरणाची आवश्यकता याबाबतची जाणीव जागृती प्रयोगात्मक कला क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकार मंडळीकडून करण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने 8 ऑक्टोबर 2021 रोजी निर्गमित केला आहे.
प्रत्येक जिल्ह्यात प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील कलाकारांद्वारे जाणीव जागृती करणे यासाठी तीन कोटी रुपयांपर्यंत खर्च करण्याची मान्यता देण्यात आली आहे. जाणीव जागृतीचे कार्यक्रम विविध लोककला प्रकारातील लोककलावंत, प्रयोगात्मक कला सादर करणाऱ्या कलाकारांकडून करण्यात येतील.
कोविडविषयक जाणीव जागृतीसाठी कार्यक्रम करीत असताना कोविडकाळात कमीत कमी व्यक्तींच्या उपस्थितीत लग्नसमारंभ, कमीत कमी व्यक्तींच्या उपस्थितीत धार्मिक बाबी, सण-उत्सव, प्रथा- परंपरा, कार्यक्रम, महोत्सव यांचे आयोजन करीत असताना राज्य शासनाचे कोविडसंदर्भातील नियम पाळणे, मास्कचा वापर, साबणाचा वापर करुन हात धुणे, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची काळजी, शासनाची कोविडबाबत नियमावली, लसीकरण इत्यादी विषय तसेच स्थानिक परिस्थिती आणि आवश्यकतेनुसार जिल्हाधिकारी किंवा त्यांना प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांकडून सुचविण्यात आलेल्या विषयांवर कलाकारांनी आपापल्या कलेतून जाणीव जागृती करायची आहे.
या जाणीव जागृती कार्यक्रमासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील कलाकारांची निवड माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या अधिनस्त क्षेत्रीय कार्यालयाच्या मदतीने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समित्या गठीत करण्यात येईल. कोविडबाबत जनजागृती कार्यक्रमांचे सनियंत्रण संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीमार्फत करण्यात येईल. ही समिती या कार्यक्रमावर देखरेख आणि नियंत्रण ठेवतील. जाणीव जागृतीचे कार्यक्रम करणाऱ्या कलाकरांना संबंधित जिल्हाधिकारी किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांकडून कार्यादेश देण्यात येईल. सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत प्रति जिल्हाधिकारी 8 लाख 30 हजार रुपये इतका निधी वर्ग करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात ग्रामपंचायतस्तरावर समूह स्वरुपात किंवा एकल स्वरुपात कार्यक्रम सादरीकरण झाल्यानंतर गावातील तलाठी/ग्रामसेवक यांनी कार्यक्रम संपन्न झाल्याबाबतचे प्रमाणपत्र कलाकारांना देणे आवश्यक राहील. तर शहरी भागात समूह स्वरुपात किंवा एकल स्वरुपात कार्यक्रम सादरीकरण झाल्यानंतर संबंधित महानगरपालिका क्षेत्रांमध्ये आयुक्त किंवा त्यांनी प्राधिकृत केलेला अधिकारी/नगरपालिका क्षेत्रात मुख्याधिकारी किंवा त्यांनी प्राधिकृत केलेला अधिकारी यांनी कार्यक्रम संपन्न झाल्याबाबतचे प्रमाणपत्र कलाकारास देणे आवश्यक राहील.
कोविड संसर्ग प्रतिबंध आणि लसीकरण जाणीव जागृती कार्यक्रमासाठी वासुदेव, बहुरुपी इत्यादी एकल कलाकारास एका दिवसासाठी जास्तीत जास्त पाचशे रुपये मानधन प्रती कलाकार देय राहील. एका दिवसात एकल कलाकाराने किमान 3 सादरीकरण करणे अपेक्षित आहे. एका एकल कलाकारास जास्तीत जास्त 10 दिवस कार्यक्रम देता येतील. म्हणजेच एका एकल कलाकारास एकूण जास्तीत जास्त 5 हजार रुपये मानधन मिळू शकेल. दोन किंवा तीन कलाकारांच्या समूहास रोज कमीत कमी दोन सादरीकरण करणे आवश्यक राहील. समूहातील प्रत्येक कलाकारास प्रति कार्यक्रम पाचशे रुपये इतके मानधन देय राहील. एका समूहास जास्तीत जास्त 10 कार्यक्रम सादर करता येतील.
प्रत्येक जिल्ह्यात जाणीव जागृतीपर कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांची कमाल मर्यादा 166 असेल.जाणीव जागृतीपर कार्यक्रम सादर करताना राज्य शासनाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व नियमांचे पालन करणे आवश्यक राहील. जाणीव जागृतीचा प्रचार व प्रसार करताना कलाकाराने स्वत:च्या जबाबदारीवर सहभाग घेत असल्याचे हमीपत्र लिहून देणे आवश्यक आहे. तसेच कोणावरही टीका होणार नाही याची दक्षता घेण्याची जबाबदारी संबंधित सादरकर्त्यां कलाकारावर राहील.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.