महाविकास आघाडीकडून पुकारलेल्या बंदला मुंबईसह राज्यात संमिश्र प्रतिसाद
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातल्या लखीमपूर घटनेचा निषेध करण्यासाठी आणि शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी पुकारलेल्या बंदला मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
राज्यातल्या बहुतेक कृषी उत्पन्न बाजार समित्या, मार्केट यार्डातली फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा बंद असून बाजार आवारातले सर्व व्यवहार बंद आहेत, या बंदला आडत्यांप्रमाणेच कामगार, तोलणार, टेम्पो संघटनांनीही पाठिंबा दर्शविला आहे.
लखिमपूर इथं झालेल्या घटनेबद्दल उत्तर प्रदेशातल्या योगी सरकारच्या निषेधार्थ मुंबईत राजभवनासमोर कॉंग्रेसनं मौनव्रत आंदोलन केलं. वरळीत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या बंदमध्ये सहभागी झाल्या. मुंबईत विविध ठिकाणी दुकानं बंद होती. तसंच रास्ता रोकोही करण्यात आला.
मुंबईत विलेपार्ले, दादर, वरळी, काळाचौकी आदी ठिकाणी पुकारल्या बंदमध्ये शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. मुंबईतली दुकान आणि बाजारपेठा दुपारी चार पर्यंत बंद राहणार असल्याचं किरकोळ व्यापारी संघाचे विरेन शहा यांनी सांगितलं. मुंबईतल्या डबेवाल्यांनीही या बंदला पाठिंबा दिलाय.मुंबईत काल मध्यरात्रीपासून आतापर्यंत आठ बसेसची तोडफोड झाल्याची माहिती बेस्ट प्रशासनानं दिलीय. बेस्टनं गाड्या चालवण्यासाठी पोलीस संरक्षणाची मागणी केली असून सध्या तुरळक बस रस्त्यावर धावत असल्याची माहिती बेस्टन दिली.
अंधेरी, ओशिवरा बेस्ट आगार बंद ठेवलं आहे. मुंबई सेंट्रल आगारात एसटी बस उभ्या आहेत. त्यामुळं प्रवाशांची मोठी अडचण झालीय. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपाचे नेते आशिष शेलार, नितेश राणे, मनसेचे यशवंत किल्लेदार यांनी बंदला विरोध केला आहे.ठाण्यातही या बंदचा फटका परिवहन सेवेला बसला आहे. महानगरपालिकेची टीएमटी बस सेवा पूर्णतः बंद आहे. एकही बस आगारातून बाहेर पडलेली नाही. पण रिक्षा आणि एसटीच्या बसेस तुरळक प्रमाणात सुरू आहे. बंदचा परिणाम रेल्वे स्थानक परिसरात चांगला जाणवत आहे.
ठाणे शहरात महाविकास आघाडीनं मोर्चा काढला. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.पालघर जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद दिसून आला. आवश्यक वस्तूंची दुकानं वगळता सर्व दुकानं, एसटी बस, रिक्षा सर्व काही बंद आहे. या बंदचा वाहतुकीवर परिणाम झाल्यानं कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले. बोईसर मध्ये वाहतूक व्यवस्था सुरळीत असून बरीच दुकानंही सुरू आहेत. जिल्ह्यात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.रायगड जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. अनेक ठिकाणी बस वाहतूक बंद आहेत.
अलिबागमध्ये अनेक दुकानं उघडी दिसत आहेत. बंद शांततेत पाळला जात आहे. कुठंही अनुचित प्रकार घडला नसल्याचं रायगड पोलिसांनी सांगितलं.सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वच ठिकाणच्या बाजारपेठा आणि दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरु होते. बंदला पाठिंबा देण्यासाठी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कणकवली शहरात निषेध मोर्चा काढण्यात आला. या निषेध मोर्चाला महाविकास आघाडी पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कणकवलीत काही ठिकाणी शिवसैनिकांनी जबरदस्तीनं दुकानं बंद करायला लावल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी तसंच कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केला.
सातारा जिल्ह्याच्या विविध भागात या बंदला प्रतिसाद मिळत आहे. अत्यावश्यक सोडून सर्व दुकानं, खाजगी वाहतूक बंद असून रस्त्यावर नेहमीपेक्षा कमी गर्दी दिसत आहे.नाशिक शहरासह जिल्ह्यात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. विशेषतः ग्रामीण भागांमध्ये अधिक प्रतिसाद मिळाला असून बाजारपेठा बंद आहे.
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात आज महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंदचं आवाहन करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेससह मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे नेते आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. नवीपेठ परिसरातून काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली.गडचिरोलीत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी उत्तर प्रदेश सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत, बाजारपेठा बंद ठेवण्याचं आवाहन केलं.
धुळ्यातल्या प्रमुख महामार्गावर ठिकठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रास्तारोको आंदोलन केलं. त्यामुळे मुंबई-आग्रा महामार्गावर चाळीसगाव चौफुली तसंच कापडणे, सोनगीर, इथं वाहतूक ठप्प झाली. रास्तारोको करणाऱ्या कॉग्रेस आमदार कुणाल पाटील यांच्यासह शिवसेना, कॉग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. सुरत-नागपूर महामार्गावर नेर, कुसुंबा, साक्रीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं.
वाशीम जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळत असून अनेक ठिकाणी बाजारपेठ बंद आहे. जिल्ह्यातल्या पाचही कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये व्यवहार बंद आहेत. अत्यावश्यक सेवा, तसंच काही प्रमाणात खाजगी वाहतूक सुरू आहे.सांगलीतही बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.प्रमुख बाजार पेठेतली दुकानं, व्यवसाय बंद आहेत. महाविकास आघाडीनं निषेधफेरी काढून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन केलं
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.