नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांना देशभरातून अभिवादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज १२५वी जयंती आहे. यानिमीत्तानं राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम.व्यंकैय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केलं आहे. आपल्या स्वतंत्र भारताच्या संकल्पासाठी नेताजींनी अत्यंत धाडसी पावलं उचलली, त्यांचं व्यक्तिमत्व आणि त्याग देशाला नेहमीच प्रेरणा देत राहिल असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

नेताजींनी भारताच्या निर्मितीसाठी दिलेल्या योगदानाकरता आपण त्यांच्यासमोर नतमस्तक होत आहोत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे. माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनीही आज उत्तर प्रदेशातल्या भाजपा कार्यालयात सुभाषचंद्र बोस यांना पुष्पांजली अर्पित केली. सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमीत्त संसदेच्या आवारात अभिवादन कार्यक्रम झाला. यावेळी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासह संसदेच्या अनेक आजी माजी सदस्यांनी, सेंट्रल हॉल इथल्या सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली.

नवी दिल्लीत इंडिया गेट इथं  नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा ग्रेनाईटचा पुतळा उभारला जाणार आहे. हा पुतळा पुर्ण होईपर्यंत त्याठिकाणी नेताजीचा पुतळा त्रीमिती छायाप्रकाशाच्या साहाय्यानं साकार जाणार आहे. या होलोग्राम पुतळ्याचं अनावरण आज, नेताजींच्या जयंतीनिमीत्त प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते २०१९, २०२०, २०२१ आणि २०२२ या वर्षांसाठीच्या सुभाष चंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कारांचं वितरणही केलं जाईल. यंदाच्या पुरस्कारांमध्ये संस्थांच्या वर्गवारीत गुजरातमधल्या आपत्ती व्यवस्थापन संस्थेला तर वैयक्तीक वर्गवारीत प्राध्यापक विनोद शर्मा यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती. त्यानिमित्तानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या अमोघ नेतृत्वासाठी ते कायम स्मरणात राहतील असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनीही बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली. बाळासाहेबांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र घडवणं आणि संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न साकार करणं ही त्यांना खरी आदरांजली ठरेल अशा शब्दांत अजित पवार यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.

बाळासाहेब हे मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी आयुष्यभर संघर्ष करत होते असं महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. बाळासाहेबांनी मराठी माणसाच्या हितासाठी नेहमीच रोखठोक भूमिका घेतली अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमीत्त मुंबईत शिवाजी पार्क इथल्या स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच शिवसैनिक येत आहेत. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही आज सकाळी स्मृती स्थळाला भेट देऊन बाळासाहेबांना अभिवादन केलं.

Popular posts
सफाई कामगारांच्या पाल्यांना वारसा हक्क नियमानुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image