देश आणि राज्यात होळी आणि धुलीवंदनाचा उत्साह

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातही आज होळी आणि धुलीवंदनाचा सण उत्साहानं साजरा केला जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानं सुमारे दोन वर्षांनंतर मुंबई, ठाणे, नवी, मुंबईसह सगळीकडेच नागरिक एकमेकांना रंग लावून धुलीवंदनाचा आनंद घेत आहेत. सर्वत्रच लहान मुलांमध्ये धुलीवंदन साजरा करायचा सर्वाधिक उत्साह दिसून येत आहे. होळीपौर्णिमेनिमित्त काल होलिका दहन केल्यानंतर आज होळीचा रंगोत्सव संपूर्ण देशासह परदेशांतही अत्यंत उत्साहात साजरा होत आहे. वसंत ऋतुच्या आगमनाची चाहूल घेऊन येणाऱ्या या रंगोत्सवानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम वैंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. रंगांचा हा उत्सव सगळ्यांच्या आयुष्यात उत्साह आणि आनंद घेऊन येवो. या उत्सवामुळे सगळ्यांच्या आयुष्यात सकारात्मक उर्जा निर्माण होते आणि यामुळे राष्ट्रउभारणीची भावना मजबूत होते असं कोविंद यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. होळीच्या सणामुळे शांतता, एकता, संपन्नता आणि आनंद यामुळे समाजाचे भावनिक बंध मजबूत होतात, असं नायडू यांनी आपल्या शुभेच्छा संदेशांत म्हटलं आहे.