नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईत भाजपचा मोर्चा

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईत भाजपनं आज धडक मोर्चा काढला. कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम याच्या साथीदारांसोबत मंत्री मलिक यांनी जमीन खरेदीचा व्यवहार केल्यानं त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी भाजपनं केली आहे. राज्य सरकार जोपर्यंत मलिकांचा राजीनामा घेणार नाही तोपर्यंत भाजप संघर्ष चालूच ठेवणार असल्याचा इशारा विरोधी पक्षेनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिला. पाकिस्तान धार्जिण्या लोकांच्या विरोधातील देशभक्तांचा हा संघर्ष आहे.  बॉम्ब स्फोट आरोपी सोबत व्यवहार करणाऱ्याचा राजीनामा होत नाही तो पर्यंत आम्ही झुकणार नाही. जेलमध्ये असलेल्या व्यक्ती कडून जमीन घेतली गेली. या व्यवहारातील काळा पैसाच पुढील दहशतवादी कृत्यांसाठी वापरला गेल्याचा आरोप फडणवीस यांनी यावेळी केला. आझाद मैदान येथील या आंदोलनात फडणवीस यांच्यासह प्रविण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार यांचीही भाषणे झाली. या आंदोलनाला भाजपचे महत्वाचे नेते, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.