राज्यात साखर उत्पादनाचा १ कोटी मेट्रिक टनांचा टप्पा पूर्ण

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यानं साखर उत्पादनाचा १ कोटी मेट्रिक टनांचा टप्पा पूर्ण केला आहे. कोल्हापूर विभागानं २६ लाख ४७ हजार मेट्रिक टन साखर उत्पादन करत राज्यात आघाडी घेतली आहे. साखरेच्या उताऱ्यातही ११ पूर्णांक ६९ शतांश टक्के उतारा नोंदवत कोल्हापूर विभाग प्रथम क्रमांकावर आहे. शिवाय, कारखानानिहाय साखर उताऱ्यामध्ये कोल्हापूर विभागातला दूधगंगा-वेदगंगा कारखाना १२ पूर्णांक ९७ शतांश टक्के उताऱ्यासह राज्यात प्रथम स्थानावर आहे.

राज्यामध्ये चालू हंगामात १९७ साखर कारखाने सहभागी झाले आहेत. या कारखान्यांमध्ये ९ कोटी  ७५ लाख मेट्रिक टन उसाचं गाळप पूर्ण झाले आहे. शुक्रवारी साखर आयुक्तांकडे उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार साखर उत्पादन १ कोटी ३८ हजार मेट्रिक टनांवर पोहोचलं आहे. यामध्ये राज्याचा सरासरी साखर उतारा १०.२९ टक्के नोंदवला गेला आहे.