विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा निर्माण कराव्यात – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत

  विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा निर्माण कराव्यात – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत

मुंबई : बदलत्या काळानुसार विद्यार्थी हित लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मुंबई विद्यापीठातील नवीन ग्रंथालय इमारत, नवीन परीक्षा भवन, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह, मुलींचे वसतिगृह या इमारतींच्या कामकाजाबाबत आढावा घेतला.

मुंबई विद्यापीठाच्या विविध अडचणींसंदर्भात कलिना कॅम्पसमध्ये आढावा बैठक झाली. या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अजित बाविस्कर, मुंबई विभागाचे सह संचालक सोनाली रोडे, प्र.कुलगुरू रवींद्र कुलकर्णी, कुलसचिव सुधीर पुराणिक मुंबई महानगरपालिका, एमएमआरडीएचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री श्री. सामंत म्हणाले, मुंबई विद्यापीठ आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले आहे. या विद्यापीठाची गुणवत्ता अधिक वाढवून विद्यार्थ्यांना उत्तम शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांसाठी राज्य शासन सहकार्य करेल. मुंबई विद्यापीठ, मुंबई महानगरपालिका, एमएमआरडीए यांनी यासंदर्भात समन्वयाने काम करावे. त्यासाठी तातडीने नोडल ऑफिसर नियुक्त करावे त्यामुळे या कामांना गती येईल.

मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालयासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाने गांभीर्याने काम करावे, खूप जुने ग्रंथ येथे उपलब्ध आहेत त्यांचे जतन आणि संवर्धन करणे आवश्यक आहे. या इमारतीमध्ये विद्यार्थी अभ्यासासाठी बसतात. येथे काही दुर्घटना होऊ नये याकडे विशेष लक्ष देऊन तातडीने नवीन ग्रंथालयामध्ये ग्रंथसंपदा स्थलांतर करावी, यासाठी आवश्यक त्या परवानग्या तातडीने संबंधितांनी द्याव्यात, असे निर्देशही श्री. सामंत यांनी यावेळी दिले.

कंत्राटी कामगारांना नियमाप्रमाणे वेतन वेळेवर दिले पाहिजे. अनेक कामगारांना वेतन नियमानुसार मिळत नसल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त होत आहेत त्यावर विद्यपीठाने तातडीने कार्यवाही करावी आणि कामगारांना वेतन द्यावे, असे निर्देश मंत्री श्री.सामंत यांनी दिले.

मुंबई विद्यापीठ नवीन ग्रंथालय इमारत, नवीन परीक्षा भवन, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह, मुलींचे वसतिगृह या इमारतीचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत लवकर उद्घाटन करण्याचा निर्णय ही बैठकीत घेण्यात आला.

एमएमआरडीएनी विद्यापीठाचा बृहतआराखडा लवकर सादर करावा. मुंबई विद्यापीठात लवकर  जनता दरबारचे आयोजन करण्यात येणार असून यामध्ये विद्यार्थी, शिक्षक शिक्षेकतर कर्मचारी, विविध प्राध्यापक संघटना यांच्या तक्रारी, पेंशन विषय, प्रलंबित मेडिकल बिल, अनुकंपा भरती याबाबत निर्णय घेण्यात येईल. या जनता दरबारमध्ये सहभागी होण्याचे आवाहनही यावेळी श्री. सामंत यांनी केलं.

मराठी भाषेला ‘अभिजात’ दर्जा मिळावा यासाठी राज्य सरकारकडून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पोस्ट कार्डस पाठविण्यात येत आहेत या मोहिमेत विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही श्री. सामंत यांनी यावेळी केले.