राज्याच्या अनेक भागात झालेल्या अवकाळी पावसानं पिकांचं नुकसान

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कालपासून अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं वृत्त आहे.नाशिक जिल्ह्यात गेले दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे १ हजार १७६ हेक्टार क्षेत्रावरच्या गहू आणि भाजीपाला पीकांचं नुकसान झालं, तर ६६ गावांमधले १ हजार ९९२ शेतकरी बाधित झाल्याची प्राथमिक माहिती आहे. चांदवड तालुक्यात वाकी बुद्रुक इथं अंगावर वीज कोसळल्यानं एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर इतर काही भागांत पाच जनावरं दगावल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड, वैजापूर, पिशोर, सोयगावसह औरंगाबाद शहरात अवकाळी पाऊस झाला. जालना जिल्ह्यातही अनेक भागात मेघगर्जनेसह पाऊस झाला. अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यात गव्हासह, कांदा आणि हरभरा पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. धुळे नंदुरबार जिल्ह्याचा सीमावर्ती भाग असलेल्या नवापुर तालुक्यात अनेक ठिकाणी पाऊस आणि गारपीट झाली. यामुळे कांदा, गहू, हरभरा, भुईमूग, ज्वारी पिकांचं नुकसान झालं. गारपीटीमुळे बोपखेल गावात बर्फाची पांढरी चादर पसरल्यासारखी परिस्थिती असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.