राष्ट्रीय पंचायत उत्कृष्ट जिल्हा परिषद पुरस्कारात कोल्हापूर जिल्हा परिषद अव्वल

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय पंचायत राज दिनाचं औचित्य साधत केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांमधे दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार 2022 साठी उत्कृष्ट जिल्हा परिषद पुरस्कारात कोल्हापूर जिल्हा परिषद अव्वल ठरली आहे. पंचायत समिती पुरस्कारामध्ये राहता जिल्हा-अहमदनगर, आणि मालवण जिल्हा सिंधुदुर्ग, या पंचायत समित्यांची निवड झाली आहे.  उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कारात राज्यातल्या 17 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्याचबरोबर बालसुलभ ग्राम पंचायत पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यातल्या श्रृंगारवाडी ग्रामपंचायतीला, तर ग्राम पंचायत विकास आराखडा पुरस्कार अहमदनगरच्या लोहगाव या ग्रामपंचायतीला मिळाला आहे. त्याबराबरच नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार 2022 हा उस्मानाबाद जिल्यातल्या भंडारवाडी या ग्रामपंचायतीला मिळाला असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. दिनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार 2022 अंतर्गत उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कारात मोदाळे ता.इगतपुरी जि.नाशिक, लोहगाव ता.राहता जि.अहमदनगर, लोणी बुद्रुक ता.राहता जि.अहमदनगर, कोतावडे ता.कडेगाव, जि.सांगली, वाघोली ता.मोर्शी जि.अमरावती, बावी कौल ता.जि.उस्मानाबाद, धारुर ता.जि.उस्मानाबाद, शिरगाव ता.कडेगाव जि.सांगली, दरी ता.जि.नाशिक,  नेरी ता.मोहाडी जि.भंडारा, श्रृंगारवाडी ता.आजरा जि.कोल्हापूर, नन्व्हा ता.सालेकसा जि.गोंदिया, धोरोशी ता.पाटण जि.सातारा, झरी ता.लोहा जि.नांदेड, आरे ता.गुहागर जि.रत्नागिरी, मुठेवडगाव ता.श्रीरामपूर जि.अहमदनगर, आणि खानापूर ता.जि.उस्मानाबाद या 17 ग्रामपंचायतींची निवड झाली आहे. दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कारअंतर्गत कोल्हापूर जिल्हा परिषदेला 50 लाख रुपये, राहता आणि मालवण या पंचायत समित्यांना प्रत्येकी 25 लाख रुपये, तर 17 ग्रामपंचायतींना लोकसंख्येप्रमाणे 5 ते 15 लाख रुपयांपर्यंतची रक्कम पुरस्कार स्वरुपात थेट खात्यात प्राप्त होईल, बालसुलभ ग्राम पंचायत पुरस्कारापोटी श्रृंगारवाडी या ग्रामपंचायत, आणि ग्राम पंचायत विकास आराखडा पुरस्कारापोटी लोहगाव या ग्रामपंचायतींना प्रत्येकी 5 लाख रूपये थेट प्राप्त होतील. तर, नानाजी देशमुख राष्टीय गौरव ग्रामसभा पुरस्कारासाठी भंडारवाडी  ग्रामपंचायतीला10 लाख रूपये रक्कम थेट प्राप्त होईल. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुरसकारप्राप्त जिल्हा परिषद, पंचायत समित्या, आणि ग्रामपंचायती तसंच सर्व सरपंच आणि संबंधित पदाधिकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांचं कौतुक आणि अभिनंदन केलं आहे.