चंद्रपुरात अवकाशातून पड़लेल्या वस्तूंच्या तपासणीसाठी इस्रोचे पथक दाखल

 

मुंबई (वृत्तसंस्था) : चंद्रपूरातल्या विविध ठिकाणी काही दिवसांपूर्वी अवकाशातून पडलेल्या कथित उपग्रहाच्या अवशेषांची पाहणी करण्यासाठी इस्रोचं पथक काल चंद्रपूरात दाखल झालं. चंद्रपुरात दाखल झाल्यावर या पथकानं सिंदवाही पोलीस ठाण्याला भेट देऊन तिथे जमा केलेल्या अवशेषांची पाहणी केली. यावेळी या पथकानं स्थानिक लोकांशीही चर्चा केली. यानंतर सावली, ब्रम्हपुरी आणि चिमूर तालुक्यात जिथे जिथे अवशेष आढळले होते, त्या जागांनाही भेट देणार आहे.  

अलिकडेच २ एप्रिलला, अवकाशातून चंद्रपूर जिल्ह्यातल्या सिंदवाही, सावली, ब्रम्हपुरी आणि चिमूर तालुक्यात उपग्रहसदृश्य वस्तुचे अवशेष कोसळले होते. यात सिंदेवाही तालुक्यातल्या लाडबोरी गावात ४०० किलो वजनाचे गोलाकार कडे आढळले होते. याशिवाय पवनपार गावातल्या जंगलासह अनेक ठिकाणी धातूचे गोळे आढळले होते.