चुकीची माहिती पसरविणाऱ्य़ा २२ युट्युब चॅनेलवर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे निर्बंध

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय सुरक्षा तसंच परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेसंदर्भात चुकीची माहिती पसरवणाऱ्या २२ यु ट्युब चॅनेलचं प्रसारण केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं थांबवलं आहे. यातली १८ भारतातून तर ४ पाकिस्तानातून चालवली जात होती अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. 

माहिती आणि तंत्रज्ञान अधिनियम २०२१ लागू केल्यानंतर प्रथमच यु ट्युबच्या भारतीय वाहिन्यांवर कारवाई करण्यात आली आहे. बंदी आणलेल्या यु ट्युब वाहिन्यांवरील व्हिडीओ २६० कोटींहून अधिक प्रेक्षकांनी पाहिले होते.  याशिवाय तीन ट्वीटर खाती, एक फेसबुक खातं आणि एका वृत्त संकेतस्थळावरही निर्बंध लादण्यात आले आहेत.

या वाहिन्या खोट्या बातम्यांचं प्रसारण करत होत्या. विशेषत: जम्मू काश्मिर, भारतीय संरक्षण दलांसंदर्भात खोटी माहिती प्रसारित केली जात होती. रशिया-युक्रेन युद्ध, कोरोना संकट याविषयीही हे चॅनेल चुकीच्या बातम्या प्रसारित करत होते. भविष्यातही अशाप्रकारची कारवाई करण्यापासून सरकार मागे हटणार नाही, असं ठाकूर यांनी स्पष्ट केलं.