९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी उदगीरनगरी सज्ज

 


मुंबई (वृत्तसंस्था) : पंचाण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी लातूर जिल्ह्यातली उदगीर नगरी सज्ज झाली आहे. या संमेलनाचं उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते उद्या सकाळी होणार आहे. त्याआधी सकाळी ग्रंथदिंडी, ध्वजारोहण आणि ग्रंथप्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे. उद्घाटन समारंभाला संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांच्यासह ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोकणी लेखक दामोदर मावजो, स्वागताध्यक्ष पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोड, मंत्री अशोक चव्हाण, सुभाष देसाई, अमित देशमुख उपस्थित राहणार आहेत. संमेलन स्थळाचं ‘लता मंगेशकर साहित्यनगरी’ असं नामकरण करण्यात आलं असून, विविध कार्यक्रमांसाठी सात व्यासपीठ तयार करण्यात आले आहेत. साहित्यप्रेमींच्या स्वागतासाठी शहरातल्या मुख्य मार्गावर स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत.तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात मान्यवर साहित्यिकांची भाषणं, विविध विषयांवर परिसंवाद, निमंत्रितांचं कविसंमेलन, यासह विविध कार्यक्रम होणार आहेत.