देशभरात सर्वत्र रामनवमी उत्साहात साजरी

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आज प्रभू श्रीरामाचा जन्म दिवस रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. यानिमित्तानं राममंदिरामधे राम जन्माचा सोहळा आणि विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासियांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. श्रीरामाचा आदर्श आपल्या आचरणात आणण्याचा आणि प्रभुरामचंद्राच्या आठवणीचा आजचा दिवस आहे. असं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. श्रीरामाचे जीवन हे आपल्याला सदाचार, सहिष्णूता, दया आणि बंधुत्वाचे आचरण करण्याची प्रेरणा देतं असंही त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती व्यकंय्या नायडू यांनीही रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या असून प्रभुरामचंद्राचे जीवन हे सदाचार, शौर्य, न्याय आणि सत्याचे आचरण करण्याची जाणीव निर्माण करणारे आहे असं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. ही रामनवमी देशवासीयांच्या जीवनात शांतता आणि आनंद निर्माण करेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रभु श्रीरामाच्या आशीर्वादाने प्रत्येकाच्या आयुष्यात शांतता, आनंद आणि समृद्धी येईल असं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. प्रभू श्रीराम हे संपूर्ण भारताचे दैवत आणि आदर्श असून त्यांच्या त्याग भावनेने आज मर्यादा पुरूषोत्तम म्हणून ते संपूर्ण विश्वाला व्यापून आहेत, असं  राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे. राज्यपाल आज रामनवमीनिमित्त नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात विधिवत पूजा करून प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतलं, त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षणमंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ उपस्थित होते.

राग, लोभ, मोह, मत्सर, अहंकाराला जीवनातून वर्ज्य करण्याची शिकवण प्रभू श्रीरामचंद्रांनी दिली. आज, न्यायालयाच्या निर्णयानंतर अयोध्येत उभं राहत असलेलं त्यांचं भव्य मंदिर प्रभू श्रीरामचंद्रांच्या आदर्श जीवनाची, सद्गगुणांची ओळख जगाला करुन देईल, असा विश्वास व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना श्रीरामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. अकोल्यात श्रीराम जन्मोत्सव सोहळा थाटात साजरा होत आहे. शोभायात्रा समितीच्या वतीनं श्रीराम जन्मोत्सवानिमित्त शहराच्या प्रमुख चौकाचौकांमध्ये भगव्या पताकांनी आकर्षक सजावट करण्यात आली आहे. श्रीराम जन्मोत्सवाच्या निमित्तानं  बीड शहरात सामुदायिक रामरक्षा स्त्रोत्र पठणाचे आयोजन करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यात राम नवमी महोत्सवाच्या निमित्तानं नांदेड शहरात ७ तर जिल्ह्यात २१ ठिकाणी मिरवणूका काढण्यात येत आहेत. या मार्गावर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सोलापूरच्या श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं श्रीराम नवमी निमीत्त श्री.विठ्ठल रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात नयनरम्य अशी आरास करण्यात आली आहे.