आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताच्या दीपक पुनियानं जिंकलं रौप्यपदक

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मंगोलियामध्ये उलानबाटार इथं झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताच्या दीपक पुनियानं पुरुषांच्या ८६ किलो फ्रीस्टाइल कुस्तीतलं रौप्यपदक जिंकलं, तर विकीनं ९२ किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावलं. काल या स्पर्धेचा शेवटचा दिवस होता.

दीपकला अंतिम सामन्यात कझाकस्तानच्या अजमत दौलेटबेकोव्हनं १-६ नं पराभूत केलं. दीपकचं हे सलग दुसरं रौप्य आणि दोन कांस्यांसह चौथं आशियाई पदक ठरलं. ९२ किलो वजनी गटात कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत विकीनं त्याचा उझबेक प्रतिस्पर्धी अजिनियाझ सपर्नियाझोव्हचा ५-३ नं पराभव केला. भारतानं या स्पर्धेत एक सुवर्ण, पाच रौप्य आणि अकरा कांस्य पदकांची कमाई केली.