पशुधन चिकित्सेबाबत अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील - उपमुख्यमंत्री अजित पवार
• महेश आनंदा लोंढे
पुणे : परिसरातील वाढते नागरिकीकरण लक्षात घेता नागरिकांचा पाळीव प्राण्यांचा सांभाळ करण्याकडे कल मोठ्या प्रमाणात वाढलेला असून पाळीव प्राणाच्या आजाराचे वेळेत निदान करून चांगली सेवा देत पशुधन चिकित्सेच्याबाबतीत अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय आवारातील अतिविशेषता (सुपर स्पेशिअलिटी) पशुवैद्यकीय दवाखानाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पशुसंवर्धन आयुक्त सचिनद्र प्रताप सिंग, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री पवार म्हणाले, शेळी समूह केंद्र अमरावती जिल्ह्यात उभारण्यात येत आहे. मासळी केंद्र देखभालीसाठी रुपये 50 कोटी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. पशुसंवर्धन महोत्सवासाठी 406 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
प्राण्यांपासून मानवास होणाऱ्या आजारांचे (झुनोटिक रोग) वाढते प्रमाण लक्षात घेता, हे आजार टाळणे व त्यांचे वेळीच निदान व उपचार करण्याबरोबरच पशुपालकांना आवश्यक सविस्तर मार्गदर्शन करणे ही आज काळाची गरज असून ती जबाबदारी या संस्थेद्वारे पार पाडण्यात येणार आहे. राज्यातील एकमेव पशुवैद्यकीय दवाखाना असल्याने याचा फायदा राज्यासह जिल्ह्यातील पशुधनाला आणि पयार्याने पशुपालक शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचे श्री. पवार म्हणाले.
बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यास परवानगी दिल्यामुळे बैलांच्या किमती वाढल्या आहेत. दुधाचे दर वाढल्याने गाईंच्या किंमती वाढल्या आहेत. शेतकऱ्यांना त्यांचा फायदा होत असल्याचे सांगून देशी गायी, म्हशी प्रयोगशाळा उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. येत्या काळात सर्व विभागात आवश्यक पदभरती करण्यास वित्त विभागातर्फे परवानगी देण्यात येणार आहे. विकासकामे करतांना निधीची कमतरता पडू देणार नसल्याचेही उपमुख्यमंत्री म्हणाले.
पशुधन विषयक सर्व सेवा एकाच छताखाली उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न
पशुसंवर्धन राज्यमंत्री श्री. भरणे म्हणाले, पशुधन विषयक सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा एकाच छताखाली उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न आहे. पुणे परिसरात जवळपास 47 खाजगी पाळीव प्राणी दवाखाने व 3 सुपर स्पेशालिटी पशुवैद्यकीय दवाखाने उपलब्ध असून या मार्फत पशुवैद्यकीय सेवा दिल्या जातात. मात्र त्यांचेकडून आकारले जाणारे शुल्क सर्वसामान्य पशुपालकांच्या आवाक्याबाहेरचे आहे. या दवाखानाच्या माध्यमातून वाजवी शुल्क आकारुन आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
यावेळी या दवाखान्यासाठी पुणे महापालिकेतर्फे आयुक्त विक्रम कुमार यांच्याहस्ते 3 कोटी रुपयाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. प्रास्तविकामध्ये पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. शितलकुमार मुकणे यांनी पशुवैद्यकीय दवाखान्याची माहिती दिली.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.