देशात यंदा पर्जन्यमान सामान्य राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात यंदा नैऋत्य मोसमी पाऊस सामान्य असेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान पडणारा पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या ९९ टक्के असण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी नवी दिल्ली इथं बातमीदारांना ही माहिती दिली. सध्या ला निना परिस्थिती भूमध्य प्रशांत क्षेत्रावर निर्माण झाली आहे. मोसमी पावसापर्यंत ही परिस्थिती कायम राहील, असे संकेत मिळत आहेत. उत्तरेकडच्या भागात आणि त्यालगतच्या मध्य भारतात तसंच हिमालयाच्या पायथ्याशी आणि नैऋत्य भारताच्या काही भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर ईशान्येकडच्या बहुतांश भागात, आणि वायव्येकडच्या काही भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले.