केंद्र सरकारला ३० हजार कोटींहून अधिक निधी द्यायला रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची मंजुरी

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व्ह बँकेनं २०२१-२२ या वर्षासाठी ३० हजार ३ शे ७ कोटी रुपयांचा अधिशेष केंद्रसरकारला द्यायला मंजुरी दिली आहे. गव्हर्नर शक्तिकांता दास यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाच्या ५९६ व्या बैठकीत रिझर्व्ह बँकेचे वार्षिक अहवाल आणि खात्यांना मंजुरी देण्यात आली. सध्याची आर्थिक स्थिती, स्थानिक आणि जागतिक आव्हानं आणिभू-राजकीय परिस्थिती याबाबतच्या चर्चेसह आकस्मिक आव्हानांचा सामना करण्यासाठीचा प्रतिरोधक स्तर साडे पाच टक्के कायम ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर, केंद्रीय मंडळाचे अन्य संचालक यांच्यासह आर्थिक व्यवहार आणि वित्तीय सेवांचे सचिव या बैठकीत सहभागी झाल्याचं रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.