कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा पोलीस महासंचालकांचा इशारा

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था हाताळण्यास पोलीस दल सक्षम आहे. कुणीही कायदा हातात घेतल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं बुधवारी राज्यात आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यापार्श्वभूमीवर आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस महासंचालकांबरोबर बैठक घेतली. या बैठकीत राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. गृहमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर पोलीस महासंचालकांनी पत्रकार परिषद घेतली.

पोलीस महासंचालकांनी सांगितलं की, औरंगाबाद इथं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणाची पडताळणी पोलिसांनी केली आहे. त्याचा अहवाल तयार केला असल्याचंही पोलीस महासंचालकांनी सांगितलं आहे. 

सामाजिक एकोपा रहावा यासाठी स्थानिक पातळीवर अनेक बैठका घेतल्या आहेत. तसंच खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात ठिकठिकाणी राज्य राखीव पोलिस दलाच्या ८७ तुकड्या,  ३० हजार होमगार्ड तैनात केले आहेत.

१५ हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. त्यानंतरही जातीय तेढ निर्माण करण्याचा कुणी प्रयत्न केल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, असंही पोलीस महासंचालकांनी सांगितलं.