देशात अन्नधान्याच्या साठ्याबाबत अतिरिक्त उपलब्धतेसह सुस्थिती

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात अन्नधान्याच्या साठ्याबाबत सुस्थिती आहे, असं ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं काल सांगितलं. देशात पुढील वर्षी एप्रिलमध्ये ८० लाख मेट्रिक टन गव्हाचा साठा उपलब्ध असेल. तसंच गेल्या वर्षी सुमारे ६०० लाख मेट्रिक टन तांदूळ खरेदी झाली होती आणि यावर्षीसुद्धा तितकीच उपलब्धता अपेक्षित आहे, असं अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव सुधांशू पांडे यांनी सांगितलं.

याशिवाय इजिप्तनंतर तुर्कस्ताननंही भारतीय गहू आयात करण्यास मान्यता दिल्याची माहिती त्यांनी दिली. देशात खाद्यतेलाचाही साठा पुरेसा असून इंडोनेशियानं तात्पुरती बंदी घातल्यानंतर, पाम तेलाची आयात लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे त्यामुळे देशातील खाद्यतेलाच्या किंमती कमी होतील, असंही पांडे यांनी सांगितलं.