न्यायव्यवस्था गतिमान करत, सर्वसामान्यांना विनाविलंब न्याय मिळावा या बाबी सरकारच्या प्राधान्यक्रमावर - किरेन रिजिजू

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यायव्यवस्था गतिमान करत, सर्वसामान्यांना विनाविलंब न्याय मिळावा या बाबी सरकारच्या प्राधान्यक्रमावर असल्याचं केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री  किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद इथं महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचा पहिला पदवी प्रदान समारंभ काल रिजिजू यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी ते बोलत होते.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन न्याययंत्रणेवरच्या कामाचा अतिरिक्त भार कमी करावा, आणि सर्वसामान्यांना तत्परतेनं न्याय देणारी यंत्रणा उभारता यावी यासाठी विविध पातळ्यांवर काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. न्याययंत्रणा बळकट करण्यासाठी, कायद्याचं अचूक ज्ञान आणि त्याचा सुयोग्य वापर या महत्वाच्या बाबी आहेत, आणि त्यात विधी विद्यापीठं आणि महाविद्यालयांची भूमिका महत्वाची असणार आहे असं ते म्हणाले.

सद्यस्थितीत न्यायालयातल्या प्रलंबित खटल्यांची संख्या वाढली असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. यावेळी रिजिजू यांच्या हस्ते ५८ विद्यार्थ्यांना पदवी तर ६७ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी प्रशस्तीपत्रकं प्रदान करण्यात आली. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. के.व्ही एस सरमा, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि विद्यापीठाचे कुलपती ए.एम.खानविलकर या कार्यक्रमाला उपस्थित होते.