ऑक्टोबरपर्यंत देशात 5G सेवा सुरु करण्याची तयारी पूर्ण

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या ऑक्टोबरपर्यंत देशात फाईव्ह-जी सेवा सुरु करण्याची तयारी पूर्ण झाल्याचं दूरसंवाद मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं भारतीय टेलीग्राफ अधिकार नियम, २०१६ मध्ये सुधारणा जारी करताना बोलत होते.

देशात फाईव्ह-जी सेवा वेगानं आणि सुलभ रीतीनं लागू करण्यासाठी दूर संवादाबाबतच्या पायाभूत सुविधा निर्माण करणं हा यामागचा उद्देश असल्याचं ते यावेळी म्हणाले. एकात्मिक पद्धतीनं पायाभूत सुविधांचा विकास करण्याच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पने नुसार यंदाच्या मे महिन्यात गती शक्ती पोर्टल सुरु केल्याचं ते म्हणाले.

फाईव्ह-जी सेवा सुरु करण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची माहिती तंत्रज्ञान प्रणाली आणि रेल्वे,  महामार्ग यासारखी प्रमुख केंद्रीय मंत्रालयं या पोर्टलला जोडण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.