मुंबई (वृत्तसंस्था) : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून मुंबईत सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी २५ हजार ८२६ कोटींच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मांडल्या. यावर २२ आणि २३ ऑगस्ट रोजी चर्चा होऊन मतदान होईल असं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. कामकाजाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवनियुक्त मंत्र्यांची सभागृहाला ओळख करून दिली. त्यानंतर सर्व स्थगन प्रस्ताव फेटाळल्याची घोषणा नार्वेकर यांनी केली. यानंतर काँग्रेसकडून नाना पटोले यांनी पूर स्थितीवर चर्चेची मागणी केली. विरोधी पक्षाच्या उद्याच्या प्रस्तावात याचा समावेश करण्याची सूचना अध्यक्षांनी त्यांना केली.
राज्यातल्या पूरस्थितीवर राज्य सरकारचं पूर्ण लक्ष असून लवकरच त्यावर विस्तृत निवेदन देऊ, असं आश्वासन उपमुख्यमंत्री फडनवीस यांनी दिलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला. देशाने नेहमीच महिला सबलीकरणात पहिले पाऊल टाकून जगासमोर आदर्श ठेवला आहे. मुर्मू यांच्या निवडीने आदिवासी समाजाच्या प्रगतीमध्ये मोठा हातभार लागेल, अशी आशा शिंदे यांनी व्यक्त केली. विरोधी पक्षनेते अजित पवार, उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी नवनिर्वाचित राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांचे अभिनंदन केलं. यानंतर सभागृहाच्या वतीने दोघांचंही अभिनंदन करण्याचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आल्याची घोषणा नार्वेकर यांनी केली. महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयक, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सुधारणा विधेयक, महाराष्ट्र ग्रामपंचायत सुधारणा विधेयक, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ दुसरी सुधारणा विधेयक, आणि मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र महानगरपालिका सुधारणा विधेयक विधानसभेत मांडण्यात आलं.
सर्वात शेवटी निधन झालेल्या विधानसभेच्या माजी सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करून दिवसभराचे कामकाज तहकूब करण्यात आलं. विधानपरिषदेतही उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी पुरवणी मागण्या मांडल्या. यानंतर विविध विधेयकं आणि अध्यादेश सभागृहात मांडण्यात आले. कामकाज सुरू होताच उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषदेत सभागृह नेते म्हणून देवेंद्र फडनवीस यांची नेमणूक झाल्याची घोषणा केली. विरोधी पक्षनेते म्हणून अंबादास दानवे यांचा परिचय उपसभापतींनी सभागृहाला करून दिला. द्रौपदी मुर्मु यांची राष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल तसंच जगदीप धनखड यांची उपराष्ट्रपती पदी निवड झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी अभिनंदनपर प्रस्ताव मांडला. तळागाळातल्या शेवटच्या माणसाला न्याय मिळेल याची प्रचिती द्रौपदी मुर्मु यांच्या राष्ट्रपतीपदावर झालेल्या निवडीवरून आली, असं फडनवीस यांनी यावेळी सांगितलं. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचं अभिनंदन केलं. तळागळातली व्यक्ती लोकशाहीत उच्च पदावर पोहोचू शकते, हे मूर्मु यांच्या राष्ट्रपतीपदावरील निवडीवरून सिद्ध झालं आहे, असं दानवे यांनी सांगितलं. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचं अभिनंदन केलं. त्यानंतर हा अभिननंदनपर प्रस्ताव सभागृहात एकमतानं संमत करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा परिचय उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सभागृहाला करून दिला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्यासह अन्य मंत्र्यांचा परिचय सभागृहाला करून दिला. दिवंगत माजी सदस्यांना आदरांजली अर्पण करून सभागृहाचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आलं.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.