बूस्टर लसीकरणाची गती वाढविण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

 

मुंबई : राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांना कोविड प्रतिबंधक लशीचा दुसरा तसेच बूस्टर डोस देण्यासाठी नियोजन करुन लसीकरणाची गती वाढवावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिल्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज “कोविड व्हॅक्सिन अमृत महोत्सव” अंतर्गत लसीकरणाचा औपचारिक प्रारंभ करण्यात आला. विधिमंडळातील समिती कक्षात सुभाष पाटील आणि अशका पवार यांना लस देण्यात आली. परिचारिका लता कोहाड यांनी त्यांना लस दिली.

यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास, अपर मुख्य सचिव तथा माहिती व जनसंपर्क महासंचालक दीपक कपूर, आरोग्य आयुक्त डॉ. रामास्वामी एन., आरोग्य संचालक डॉ साधना तायडे आदी उपस्थित होते.

आरोग्य उपसंचालक डॉ. विजय कंदेवाड, डॉ. हेमंत बोरसे, ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ कैलास पवार, सहाय्यक संचालक डॉ संजीव जाधव, डॉ. विलास साळवी यांनी संयोजन केले.

केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसार ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत कोविड व्हॅक्सिन अमृत महोत्सवाअंतर्गत सर्व शासकीय केंद्रांवर १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत लस दिली जाणार आहे. मात्र नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लशीची दुसरी मात्रा घेऊन सहा महिने अथवा सव्वीस आठवड्यांचा कालावधी पूर्ण केलेला असावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.