मागचे विक्रम मोडत राज्याला प्रथम आणण्यासाठी प्रयत्न करा- क्रीडा मंत्री गिरीष महाजन
• महेश आनंदा लोंढे
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सोनेरी यश संपादन करण्यासाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंना दिल्या शुभेच्छा
पुणे : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या बळावर मागचे विक्रम मोडत राज्याला प्रथम क्रमांकाचा सन्मान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन राज्याचे क्रीडा मंत्री गिरीष महाजन यांनी केले.
गुजरात येथे सुरू झालेल्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार महेश लांडगे, क्रीडा संचालक सुहास दिवसे, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर, खजिनदार धनंजय भोसले, क्रीडा सहसंचालक चंद्रकांत कांबळे आदी उपस्थित होते
श्री. महाजन म्हणाले, प्रशिक्षक, संघटक, व्यवस्थापक आणि खेळाडूंनी मित्रत्वाच्या भावनेने एकत्रीतपणे उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रयत्न करावे. खेळाडूंना चांगल्या कामगिरीसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. खेळाडूंनी शास्त्रोक्त पद्धतीने सराव करून चांगली कामगिरी करावी. शासनातर्फे खेळाडूंच्या समस्या सोडविण्यासाठी सर्व सहकार्य करण्यात येईल.
खेळाडूंचा भोजन भत्ता वाढवून २०० ऐवजी ४८० करण्यात आला आहे. गावपातळीवर चांगल्या सुविधा असाव्यात यासाठीही प्रयत्न करावे लागणार आहेत. खेळाडूंनी शारीरिक तंदुरुस्तीकडे लक्ष द्यावे आणि व्यसनापासून दूर राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
श्री.दिवसे म्हणाले, बालेवाडी येथे १५ क्रीडा प्रकारांचे सर्व शिबीर सुरू असून राज्यात इतरत्रही अशा शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहेत. खेळाडूंना सर्व प्रकारच्या सुविधा देण्यात आल्या आहेत. यापुढील काळात क्रीडा विकासासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करून शासनास सादर करण्यात येईल. प्रत्येक खेळाडूंची माहिती डिजिटल स्वरूपात ठेवण्यात येईल. खेळाडूंनी गुजरात येथील स्पर्धेत खिळाडूवृत्तीने सहभाग घेऊन सुवर्ण कामगिरी करावी, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
प्रास्ताविकात श्री.शिरगावकर यांनी राष्ट्रीय स्पर्धेविषयी माहिती दिली. खेळाडूंना शासनातर्फे उत्तम सुविधा देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत राज्याचे खेळाडू चांगली कामगिरी करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
३४ क्रीडाप्रकारात खेळाडू पदकासाठी लढणार श्री.महाजन यांनी बालेवाडी येथील सराव शिबिरात सहभागी खेळाडूंची भेट घेऊन त्यांना राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. पदक विजेत्या महाराष्ट्र टेबल टेनिस संघांचे त्यांनी कौतुक केले. त्यांनी क्रीडा संकुलात सुरू असलेल्या पॅरा नेमबाजी स्पर्धेला भेट देऊन स्पर्धकांचा उत्साह वाढवला.
३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ३४ क्रीडा प्रकारात महाराष्ट्राचे ७०० पेक्षा अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत. ध्यानचंद पुरस्कारार्थी प्रदीप गंधे हे पथकाचे नेतृत्व करत असून बॅडमिंटन खेळाडू चिराग शेट्टी आणि कबड्डी खेळाडू सोनाली शिंगटे यांच्या ध्वजधारक संचलनात पथकाच्या अग्रभागी असतील.
स्पर्धेसाठी पुण्यातील बालेवाडी येथे महाराष्ट्रातील खेळाडूंसाठी तंत्रशुद्ध प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मागील दोन आठवड्यापासून खेळाडू या स्पर्धेसाठी तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कसून सराव करत आहेत.
स्पर्धेचे औपचारिक उदघाटन २९ सप्टेंबर रोजी होणार असून तिरंदाजी, कनॉइंग कयाकिंग, फुटबॉल, कबड्डी, खो खो, लॉन टेनिस, नेमबाजी, रोईंग, रब्बी ट्रायथालन मल्लखांब, सॉफ्ट टेनिस, रोलर स्केटिंग, योगासन अथलेटिक्स, बॉक्सिंग, तलवारबाजी, ज्युडो, वेटलिफ्टिंग, कुस्ती, वुशू, सायकलिंग, सॉफ्ट बॉल, स्क्वश, बॅडमिंटन, टेबल टेनिस, हॉलीबॉल, जिम्नॅस्टिक, हॉकी आणि जलतरण या क्रीडा प्रकारात महाराष्ट्राचा सहभाग आहे.
या स्पर्धेतील काही स्पर्धांना उद्घाटनापूर्वीच सुरुवात झाली आहे. यामध्ये टेबल टेनिसचा समावेश आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी पदके मिळवली आहेत. महाराष्ट्राचा महिला संघ रौप्य तर पुरुष संघाला कांस्य पदकाचा मानकरी ठरला.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.