कचऱ्यापासून खेळणी तयार करण्याच्या ‘स्वच्छ टॉयकॅथॉन’ स्पर्धेला सुरुवात

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कचऱ्यापासून खेळणी तयार करण्याच्या ‘स्वच्छ टॉयकॅथॉन’ स्पर्धेचा प्रारंभ आजपासून होत आहे. टाकाऊ वस्तू वापरुन खेळणी बनवण्याची ही अनोखी स्पर्धा, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयानं आयोजित केली आहे. सुक्या कचऱ्याचा वापर करून खेळण्यांच्या रचनेमध्ये नावीन्य आणण्यासाठी वैयक्तिक तसंच सांघिक गटांसाठी, ही स्पर्धा खुली आहे. या स्पर्धेतून तयार झालेल्या चांगल्या नमुना खेळण्यांपासून पुढे किमान सुरक्षा मानकांचं पालन करणारी खेळणी मोठ्या प्रमाणात बनवली जाणार आहेत.

आय आय टी गांधीनगर च्या ‘सेंटर फॉर क्रिएटिव्ह लर्निंग’ या संस्थेनं MyGov च्या ‘इनोव्हेट इंडिया’ पोर्टलवर ही स्पर्धा आयोजित केली आहे. देशातील आर्थिक विकास, उत्पन्नात झालेली वाढ आणि लहान मुलांसाठी पुढे आलेल्या अनेक नवनवीन कल्पनांमुळे खेळण्यांची मागणी वाढत आहे. ‘खेळण्यांसाठी राष्ट्रीय कृती योजना २०२०’ ही भारताला जागतिक खेळण्यांचं केंद्र म्हणून प्रस्थापित करण्यासाठी आणि पारंपारिक हस्तनिर्मित खेळण्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आली. केंद्र सरकारच्या १४ मंत्रालयांसह उद्योग आणि अंतर्गत-व्यापार प्रोत्साहन विभाग सध्या या योजनेच्या विविध पैलूंची अंमलबजावणी करत आहे.