समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायम सिंग यादव यांचं दीर्घ आजारानं निधन

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंग यादव यांचं आज सकाळी दीर्घ आजारानं निधन झाले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ते मैनपुरी लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. दिल्लीजवळ गुरगावमधल्या खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८२ वर्षांचे होते. २२ ऑगस्टपासून ते रुग्णालयात दाखल होते आणि गेल्या १० दिवसांपासून अतिदक्षता विभागात होते. त्यांच्या पार्थिवावर उद्या सैफेई अंत्यसंस्कार होणार आहेत. १९३९ मध्ये उत्तरप्रदेशातल्या सैफेई गावात जन्मलेले मुलायम सिंग, जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया, मधू लिमये यांच्यासारख्या समाजवादी नेत्यांपासून प्रभावित होऊन राजकारणात आले.

एकेकाळी कुस्तीचा आखाडा गाजवलेले मुलायम सिंग ३ वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. १९६७ मध्ये पहिल्यांदा ते उत्तर प्रदेश विधानसभेत निवडून गेले. १९७७ मध्ये राम नरेश यादव यांच्या मंत्रीमंडळात सहकार आणि पशुपालन खात्याचे मंत्री म्हणून त्यांचा पहिल्यांदा मंत्रीपदाची शपथ घेतली. याचवर्षी ते लोकदलाचे अध्यक्ष झाले. १९८० मध्ये त्यांची जनता दलाचे अध्यक्ष म्हणून निवड जाली. १९९२ मध्ये त्यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली आणि पुढच्याच वर्षी बहुजन समाज पक्षाबरोबर युतीकरून ते सत्तेत आले. एकूण १० वेळा विधानसभा आणि ७ वेळा लोकसभा निवडणूक त्यांनी जिंकली होती. १९९६ ते १९९८ या काळात त्यांनी संरक्षणमंत्रीपदही भूषवलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल भगत सिंग कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांच्यासह देशभरातल्या मान्यवरांनी मुलायम सिंग यांना आदरांजली व्यक्त केली आहे. ते देशाच्या तळागाळातून निवडून आलेले आणि सर्व राजकीय पक्षीय नेत्यांसाठी आदरणीय नेते होते, असं राष्ट्रपतींनी त्यांच्या शोकसंदेशात म्हटलं आहे. आणीबाणीच्या काळात त्यांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलं आणि लोकसभेत त्यांनी देशहिताचे मुद्दे उपस्थित केले असं प्रधानमंत्र्यांनी शोकसंदेशात सांगितलं आहे. उत्तर प्रदेश सरकारनं मुलायम सिंग यांच्या निधनामुळं ३ दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. त्यांचे अंत्यसंस्कार संपूर्ण शासकीय इतमामात केले जाणार आहेत.