पूरसदृश परिस्थितीवर सरकारने लक्ष देण्याची अजित पवार यांची मागणी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात अनेक ठिकाणी परतीचा पाऊस सुरु असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान होत आहे. पुण्यात परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांच स्वरुप आल्याचं पाहायला मिळालं. दगडूशेठ मंदिरात देखील पाणी शिरलं आहे. शहरातल्या अनेक भागात पाणी शिरलं आहे. या पूरसदृश परिस्थितीवर सरकारने लक्ष देण्याची गरज असल्याचं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते आज वार्ताहरांशी बोलत होते. धरणातून पाणी सोडताना पूर्वसूचना द्यावी, असं देखील त्यांनी सांगितलं आहे.

सातारा जिल्ह्यातही मुसळधार पाऊस होत आहे. फलटण तालुक्यातल्या सोमंथळी इथं ओढ्याला आलेल्या पुरात काल रात्री चारचाकी वाहून गेल्यानं दोन जणांचा मृत्यू झाला. जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात रात्रभर जोरदार पाऊस झाला. त्यामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहे. जालना शहरातल्या कुंडलिका नदीवरचा रामतीर्थ बंधारा ओसंडून वाहत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात सततच्या परतीच्या पावसानं शेतपीकांना मोठा फटका बसला आहे. मका, कापूस, सोयाबीन या पिकांचं नुकसान झालं आहे. आज पहाटे जिल्ह्यातल्या विविध भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. पैठण तालुक्यातील पाचोड इथल्या नदीला पूर आला असून पाचोड खुर्दचा संपर्क तुटला आहे. औरंगाबाद शहर आणि परिसरातही मध्यरात्री हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला.

सांगली जिल्ह्यात कायम दुष्काळी तालुका अशी ओळख असलेल्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. जोरदार पावसामुळे, नद्या आणि ओढे-नाले भरून वाहू लागले आहेत. जत तालुक्याच्या पूर्व भागात असणारी बोर नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. तर उत्तर भागातील कोरडा नदीला ही पूर आला आहे. एकीकडे समाधानकारक पाऊस झाला असला तरी सुद्धा द्राक्ष, डाळिंबात सहित अन्य पिकांना मात्र याचा फटका बसला आहे. शेतात पाणी साचल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.