देशव्यापी मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाला पुण्यातून प्रारंभ

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आजपासून सुरू झालेल्या मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात नागरीकांना सहभागी होण्याचं आवाहन मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केलं आहे. मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण देशव्यापी कार्यक्रमाचा प्रारंभ आज पुण्यातून झाला. निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यावेळी उपस्थित होते. त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मतदार नोंदणी आणि जागृतीपर प्रदर्शन भरवण्यात आलं, आणि दोन्ही निवडणूक आयुक्तांनी याठिकाणी तृतीयपंथीय समुदायाशी संवाद साधला.

मतदार यादीत पहिल्यांदाच नाव नोंदणी करणाऱ्या तरूण मतदारांनी कार्यक्रमाला गर्दी केली होती.शहरी मतदार आणि युवकांचा मतदार प्रक्रियेतला सहभाग वाढवण्याचा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. दिवसाची सुरूवात मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त यांनी सायकल रॅलीत भाग घेऊन केली, याचा विषय होता ‘‘सहभागी निवडणुकांसाठी सायकल चालवा’’. ही रॅली बालेवाडीच्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंग इथून सकाळी सुरु झाली. समाजाच्या विविध क्षेत्रातील मतदारांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवला, यात तृतीयपंथी व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती, महिला, तरुण आणि इतरांचा समावेश होता. ‘एकही मतदार मागे राहता कामा नये’, सर्वसमावेशक आणि सुलभ निवडणुका तसेच मतदार नोंदणीचे महत्व आणि ‘या लोकशाही प्रक्रियेत सहभाग घेण्याचं महत्व’ असे संदेश पसरविण्यासाठी २०० पेक्षा जास्त लोकांनी या रॅलीत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. मतदार जागृतीसाठी विविध उपक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे. 

विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रमा अंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील प्रारुप मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात आली. जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडेय यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या प्रारुप मतदार यादीनुसार जिल्ह्यात २९ लाख दोन हजार ११९ मतदार असून यापैकी १३ लाख ७२ हजार ६३४ महिला मतदार, १५ लाख २९ हजार ३९६ पुरुष मतदार आणि ८९ तृतीयपंथी मतदारांची नोंद झाली असल्याचं जिल्हाधिकारी पांडेय यांनी सांगितलं. जिल्ह्यात असलेल्या ८६१ ग्रामपंचायतींमध्ये उद्या विशेष ग्राम सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामध्ये मतदार यादीचं वाचन करण्यात येणार आहे.

नवमतदारांना जानेवारी, एप्रिल, जुलै, आणि ऑक्टोबर महिन्याच्या एक तारखेला मतदार नोंदणी करता येणार असल्याचं पांडेय यांनी सांगितलं. आजपासून ८ डिसेंबर पर्यंत जिल्ह्यात विशेष मतदार नोंदणी शिबीराचं आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.