संजय राऊत यांच्या जामिनाला स्थगिती देण्याची सक्तवसुली संचालनालयाची मागणी उच्च न्यायालयानं फेटाळली

 


मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या जामिनाला स्थगिती देण्याची सक्तवसुली संचालनालयाची मागणी उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेल्या राऊत यांचा जामीन अर्ज आज पीएमएलए न्यायालयाने मंजूर केला. दोन लाख रुपयांच्या हमीपत्रावर त्यांना हा सशर्त जामीन मंजूर करण्यात आला. या निर्णयाला ईडीनं मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. संजय राऊत यांच्या जामीनाला स्थगिती देण्याची मागणी ईडीनं केली होती. मात्र, कार्यालयीन प्रक्रीयेविरोधात जाऊन निकाल देऊ शकत नाही.  उद्या यासंदर्भात सुनावणी घेणार असल्याचं सांगत उच्च न्यायालयानं जामीनाला स्थगिती देण्याची मागणी फेटाळली. काही मिनिटात जामीनावर निर्णय देणं चुकीचं असल्याचं मतही न्यायालयानं नोंदविलं. दरम्यान, पीएमएलए न्यायालयाच्या आदेशाची प्रत आणि संजय राऊत यांच्या जामीनाची सर्व कागदपत्रं ऑर्थर रोड तुरुंगाच्या बाहेरील पेटीत टाकण्यात आल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली. त्यामुळे आज रात्री राऊत ऑर्थर रोड तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ३१ जुलै रोजी ईडीनं राऊत यांना अटक केली होती. आा तब्बल १०२ दिवसांनंतर संजय राऊत तुरुंगाबाहेर पडणार असल्यानं त्यांच्या समर्थकांनी ठिकठिकाणी जल्लोष करत आनंद व्यक्त केला आहे.