लम्पी चर्मरोग : नुकसान भरपाईपोटी राज्यात १० हजार ४३४ पशुपालकांच्या खात्यांवर २६ कोटी रुपये जमा – पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह
• महेश आनंदा लोंढे
मुंबई : राज्यात लम्पी चर्मरोगामुळे ज्या पशुपालकांचे गोवंशीय पशुधन मृत्युमुखी पडले, अशा १० हजार ४३४ पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाई म्हणून रु. २६.५६ कोटी रुपये जमा करण्यात आली असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.
श्री.सिंह म्हणाले की, राज्यामध्ये 30 नोव्हेंबर २०२२ अखेर 35 जिल्ह्यांमधील एकूण 3857 संसर्गकेंद्रांमध्ये लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण 3,27,246 बाधित पशुधनापैकी एकूण 2,47,202 पशुधन उपचाराने बरे झालेले आहे. उर्वरीत बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अखेर एकूण 144.12 लक्ष लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधून एकूण 139.03 लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण यांची आकडेवारी नुसार महाराष्ट्रात सुमारे 99.79 % गोवंशीय पशुधनाला लसीकरण झाले आहे.
रोग प्रादुर्भाव नियंत्रणासाठी “माझा गोठा, स्वच्छ गोठा” अभियान राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्वसाधारणपणे गोधनास कळपामध्ये चरण्यासाठी पाठविणे आणि सार्वजनिक पाणवठ्यावर त्यांना पाणी पाजण्यासाठी कळपाने नेण्याच्या गावांमधील दोन्ही पद्धती देखील लम्पी चर्मरोगाच्या प्रादुर्भावास कारणीभूत असल्याचे मत राज्यस्तरीय कार्यदलाने व्यक्त केले असल्यामुळे आयुक्त पशुसंवर्धन यांनी या दोन्ही पद्धती लम्पी चर्मरोग नियंत्रणात येईपर्यंत बंद ठेवण्याबाबत गोपालकांमध्ये जागृती करण्याच्या सूचना श्री.सिंह यांनी दिल्या.
महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठाने 23 नोव्हेंबर रोजी कीटकांच्या नियंत्रणासाठी प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून राज्यात गोठ्यातील कीटक नियंत्रण, निर्जंतुकीकरण या महत्त्वपूर्ण बाबी पशुपालक व ग्रामपंचायती यांनी मोहीम स्वरूपात राबविण्यात याव्यात. शासकीय आणि खाजगी पशुवैद्यकांनी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने दि. 28 नोव्हेंबर रोजी दिलेल्या सुधारीत उपचार मार्गदर्शक सूचनांप्रमाणे उपचार करावेत. शासनाकडून मोफत औषधोपचार व लसीकरणाचे नियोजन करण्यात आले असल्यामुळे सर्व पशुपालकांना विशेष आवाहन करण्यात येते की, त्यांनी स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या पशुधनावर उपचार करून घेण्यासाठी सहकार्य करावे.
28 ऑक्टोबर रोजीच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय कृती दलासमवेत झालेल्या दृकश्राव्य माध्यमाद्वारे आढावा बैठकीमध्ये लसीकरण न केलेल्या आणि लम्पी चर्म रोगाने बाधित नसलेल्या गायींच्या कुठल्याही वयाच्या वासरांना, तसेच अद्यापही लसीकरण न झालेल्या गोवंशीय पशुधनास लसीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले. यानुसार, गोपालकांनी त्यांच्या उक्त नमूद वासरे व गोवंशीय पशुधनास क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यकक्षेतील गावांमध्ये अशा लसीकरणासाठी मोहीम स्वरूपात पुर्वनिर्धारीत केलेल्या दिवशी लसीकरण करून घेण्याचे आवाहन आयुक्त श्री. सिंह यांनी केले आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.