महिला राष्ट्रीय मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत निखत आणि लवलिना अंतिम फेरीत दाखल

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भोपाळ इथं सुरु असलेल्या महिलांच्या राष्ट्रीय मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत विद्यमान विश्वविजेता निखत झरीन आणि टोक्यो ऑलिंपिक्स कास्य पदक विजेती लवलिना बोर्गोहाईन आपापल्या गटांमध्ये अंतिम फेरीत दाखल झाल्या आहेत. ५० किलो वजनी गटात निखत झरीनची लढत आज तेलंगणाच्या अनामिका सोबत होणार आहे. स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज, ७५ किलो वजनी गटात आसामच्या लवलिना बोर्गोहाईन हिची लढत अरुंधती चौधरीशी होणार आहे. ५७ किलो वजनी गटात हरियाणाच्या मनीषाची लढत हिमाचल प्रदेशच्या विनाक्षी सोबत होणार आहे. जागतिक चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक विजेती सिमरनजीत कौरची लढत ६० किलो वजनी गटातल्या पूनमशी होणार आहे. ४८ किलो वजनी गटात मंजू राणीची लढत तामिळनाडूच्या एस. कलईवनी सोबत होणार आहे. या स्पर्धेतल्या १२ वजन गटामध्ये ३०२ महिला मुष्टियुद्धपटू सहभागी झाल्या आहेत.