भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत जय्यत तयारी

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईत दादर इथल्या चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांची गर्दी वाढू लागली आहे. मुंबई महानगरपालिकेनं चैत्यभूमी परिसर, शिवाजी पार्क, दादर रेल्वे स्थानक, हिंदू कॉलनी इथलं राजगृह, वडाळा इथलं डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय आणि लोकमान्य टिळक टर्मिनस इथं आवश्यक त्या सर्व नागरी सेवा-सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत.

आपत्‍कालीन परिस्थितीत तात्‍पुरत्‍या निवाऱ्याची सोय म्‍हणून दादर परिसरात महानगरपालिकेच्‍या सहा शाळा निश्चित करण्‍यात आल्‍या आहेत. महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर 12 विशेष लोकल गाड्या चालवल्या जाणार आहेत. तर 14 लांब पल्ल्याच्या देखील विशेष एक्स्प्रेस गाड्या चालवल्या जाणार आहेत.

चैत्यभूमीसह मुंबईच्या विविध भागांत उद्या कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. चैत्यभूमीवरची शासकीय मानवंदना आणि पुष्पवृष्टीचं थेट प्रक्षेपण मुंबई महानगरपालिकेच्या सोशल मीडिया खात्यांवरुन केलं जाईल. तसंच चैत्यभूमी इथल्या आदरांजलीचं मोठ्या पडद्यावर आणि समाजमाध्यमांवर थेट प्रक्षेपण केलं जाईल अशी माहिती मुंबई महानगर पालिकेचे उपायुक्त रमाकांत बिरादार यांनी दिली.

मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागानं तयार केलेल्या डॉ. आंबेडकर यांचं कार्य आणि महापरिनिर्वाण दिनाची तयारी याबाबतच्या माहिती पुस्तिकेचं अतिरिक्त महानगरपालिका शहर आयुक्त आशीष शर्मा यांच्या हस्ते आज प्रकाशन करण्यात आलं. या माहिती पुस्तिकेची संगणकीय प्रत महानगरपालिकेच्या portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर, ‘अंतरंग आणि अहवाल’ या सदराखाली ई-पुस्तके या विभागात उपलब्ध आहे.

केंद्रीय संचार ब्‍यूरोच्या नागपूर कार्यालयानं 6 ते 8 डिसेंबर दरम्यान सामाजिक न्याय व विशेष सहाय्य भवन, माता कचेरी, नागपूर इथं ‘भारताचे संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर- यांचा जीवन प्रवास’ या विषयावर आधारीत छायाचित्र प्रदर्शन उभारलं आहे. सकाळी १० ते ६ दरम्यान या हे विनामूल्य प्रदर्शन पाहता येईल.