भविष्यात तृणधान्यांचा समावेश मुख्य आहारात करण्याची गरज- पंतप्रधानांचं प्रतिपादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भाविष्यात तृणधान्य अर्थात मिलेट्स हे प्रमुख खाद्य म्हणून सामील करण्यावर भर देण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाचा शुभारंभ काल इटलीतील रोम इथं अन्न आणि कृषी संघटनेच्या मुख्यालयांत झाला. यानिमित्त दिलेल्या शुभच्छासंदेशांत त्यांनी हे नमूद केलं आहे.

केंद्रिय कृषीराज्यमंत्री शोभा करंडलजे या कार्यक्रमांत भारताच्या प्रतिनिधी म्हणून उपस्थित आहेत. त्यांनी पंतप्रधानांच्या शुभच्छासंदेशाचं वाचन केलं. तृणधान्य हे मानवानं पिकवलेल्या सुरुवातीच्या पिकांपैकी एक आहे आणि ते पोषक तत्वांचा एक महत्त्वाचा स्रोत आहे.

तृणधान्याचा वापर हे अन्नसुरक्षेच्या दृष्टीनं महत्वाचं पाऊल असून शेतात पिकवण्यासाठी अतिशय सोपं, वातावरणातील बदल, शेतीच्या नैसर्गिक पद्धतींशी सुसंगत, आणि पाण्याची गरज कमी असलेलं संतुलित पोषण देणारं हे तृणधान्य असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.

तृणधान्य हा कृषी आणि आहारातील विविधता वाढविण्याचा एक चांगला मार्ग आहे. उत्पादक, ग्राहक आणि पर्यावरण यासाठी तृणधान्य उत्पादन हा चांगला पर्याय असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या संदेशांत म्हटलं आहे.