उजनीचे रब्बीचे आवर्तन १५ जानेवारीपासून ; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उजनी प्रकल्प कालवा सल्लागार समिती बैठक संपन्न

 

पुणे : उजनी प्रकल्पाची कालवा सल्लागार समिती बैठक सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे संपन्न झाली. रब्बी हंगामातील कालवा प्रवाही सिंचनाचे आवर्तन १५ जानेवारी २०२३ पासून सोडण्याचे बैठकीत ठरले.

बैठकीस पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, आमदार सुभाष देशमुख, संजय शिंदे, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, माजी आमदार कल्याणराव काळे, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता (वि. प्र.) हेमंत धुमाळ, अधीक्षक अभियंता धीरज साळे आदी उपस्थित होते.

प्रकल्पांतर्गत उपसा सिंचन योजना आणि कोल्हापूर पद्धतीचे बंधारे यांच्यावरील पाणी पट्टी वसुली तसेच त्याबाबतचे व्यवस्थापन करणे वाढत्या सिंचन क्षेत्रामुळे व मनुष्यबळाच्या मर्यादेमुळे पाटबंधारे विभागाला कठीण जात आहे. त्यामुळे ते व्यवस्थापनासाठी साखर कारखान्यांकडे हस्तांतरित करण्याचा पर्याय अवलंबवावा, असे निर्देश मंत्री श्री. विखे पाटील यांनी दिले. त्यानुसार दहिगाव उपसा सिंचन योजना आणि सीना माढा उपसा सिंचन योजना या दोन योजना तसेच भीमा, सीना आणि माण नदीवरील ५० कोल्हापूर पद्धतीचे बंधारे संपूर्ण व्यवस्थापनासाठी साखर कारखान्यांकडे हस्तांतरित करण्याबाबत अभ्यास करून प्रस्ताव सादर करण्यात येईल असे मुख्य अभियंता श्री. धुमाळ यांनी सांगितले.

सोलापूर महानगरपालिकेला पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात नदीत पाणी सोडावे लागते. महापालिकेला थेट पाणी देण्यासाठी नवीन पाईपलाईनच्या कामास गती देण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येईल, असेही श्री. विखे पाटील यांनी सांगितले.

३० जून २०२३ पर्यंत ४ अवर्तने सोडण्याचे नियोजन केले असल्याचे यावेळी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावर विभागाने योग्य नियोजन करून कालव्याची ४ ऐवजी ५ आवर्तने द्यावीत अशा सूचना पालकमंत्री श्री. विखे पाटील यांनी दिल्या. नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या आवर्तनाच्या वेळी काही दिवसांसाठी नदीकाठच्या गावांचा कृषीपंपांचा वीजपुरवठा बंद करावा जेणेकरून अवैध पाणी उपसा बंद होऊन पाणी बचत होईल, असेही ते म्हणाले.

पाण्याचा कार्यक्षम वापर व्हावा तसेच सिंचनासाठी अधिक पाणी उपलब्ध व्हावे यासाठी जलाशयातील बाष्पीभवन कमी करण्याच्यादृष्टीने शास्त्रीय पद्धतीने उपाययोजना करण्याच्या सूचना मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिल्या.


उजनी (भीमा) प्रकल्प उजवा कालवा आणि डावा कालवा या दोन्ही कालव्याचे रब्बीचे पहिले आवर्तन १५ जानेवारी २०२३ पासून सुरू करण्याचे बैठकीत ठरले. तसेच भीमा सीना जोड कालव्यातून २० डिसेंबर २०२२ ते २० जानेवारी २०२३ दरम्यान पहिले आवर्तन सोडण्यात यावे, धरणातून भीमा नदीत १० जानेवारी २०२३ रोजी पाणी सोडण्यात यावे. हे पाणी सोलापूर महानगरपालिका, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला नगरपालिका व भीमा नदी तीरावरील ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी हेळ्ळी बंधाऱ्यापर्यंत सोडण्यात यावे. सीना माढा उपसा सिंचन योजना तसेच दहिगाव उपसा सिंचन योजनेतून ५ जानेवारी २०२३ रोजी पाणी सोडण्यात यावे असे या बैठकीत निश्चित झाले.

Popular posts
वारकऱ्यांच्या सेवेसाठी जिल्हा प्रशासनाचे ‘आषाढी वारी २०२२’ ॲप
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image