मधुमेह- हृदयविकारातील नवीन घातक घटकांना वेळीच ओळखा-डॉ. शंतनू सेनगुप्ता
• महेश आनंदा लोंढे
नागपूर : हृदयविकार आणि मधुमेह या नव्या जीवनशैलीमुळे उद्भवणाऱ्या विकारांमध्ये अलिकडच्या संशोधनातून नवीन घातक घटक असल्याचे निदर्शनास आले आहेत, हे घटक वेळीच ओळखून सजग राहून आपला बचाव करावा, असे प्रतिपादन डॉ. शंतनू सेनगुप्ता यांनी आज येथे केले.
भारतीय विज्ञान काँग्रेसच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आयोजित चर्चासत्रात ‘हृदयविकार आणि मधुमेह या विषयातील नवीन संशोधन’ याविषयावर चर्चा झाली. चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. एस. जी. वसिष्ट हे होते. तर या चर्चासत्रात डॉ. शंतनू सेनगुप्ता आणि डॉ. सुनील गुप्ता या तज्ज्ञांनी सहभाग घेतला. हे दोन्ही मान्यवर नागपूरकर आहेत.
डॉ.सेनगुप्ता म्हणाले की, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी लिपोप्रोटीन सारख्या नवीन जोखीम घटकांची लवकर ओळख आणि प्रतिबंध हे महत्त्वाचे आहेत. हार्टअटॅक ला जबाबदार पर्यावरणीय, वर्तणूकीय, रोगनियंत्रण (रक्तदाब-मधुमेह) इ. घटक आहेत. यावर उपाय म्हणून दररोज 8 ते 10 हजार पाऊले चालावे. अर्ध्या तासापेक्षा अधिक कालावधीसाठी स्थिर बसल्यास थोड्या थोड्या वेळात चालावे. डिजिटल साधनाचा अतिवापर हा घातक आहे, असे त्यांनी सांगितले.
डॉ.गुप्ता म्हणाले की, मधुमेह 2021 मध्ये 537 दशलक्ष प्रौढ मधुमेहासह जगत होते. ही संख्या 2030 पर्यंत 643 दशलक्ष आणि 2045 पर्यंत 783 दशलक्षपर्यंत वाढण्याचे अनुमान आहे. रक्तातील ग्लुकोजचे लवकर निदान आणि नियंत्रण यावरच लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. भारतीय लोक इतरांपेक्षा वेगळे आहेत. त्यांची शरीराची रचना बारीक असली तरी शरीरात फॅट्स चे प्रमाण भरपूर असते. मधुमेही व्यक्तीला आपण रोगी न म्हणता ‘पेशंट विथ डायबिटीज’ अस म्हणावं. रोगाचे निदान न होता तसेच इन्सुलिनचे प्रमाण माहिती नसल्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. याबाबत अधिक माहिती असल्यास अनेक रुग्णांचे जीव वाचवता येतील,असे ते म्हणाले.सूत्रसंचालन डॉ.श्रद्धा जोशी यांनी केले.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.