घोडेगाव येथे आयोजित आपत्ती मित्र प्रशिक्षणाला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची भेट
• महेश आनंदा लोंढे
पुणे : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नवी दिल्ली यांचेकडील आपत्ती मित्रांची निवड करुन त्यांना प्रशिक्षण देण्याच्या योजनेंतर्गत जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्यातील ८० आपत्तीमित्रांना घोडेगाव येथे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी भेट देऊन माहिती घेतली.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नवी दिल्ली आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय पुणे आयोजित आपत्ती मित्र प्रशिक्षण कार्यक्रम २०२२-२३ ला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे. घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यातील पोलीस पाटील, कोतवाल, आदिवासी आश्रम शाळेतील शिक्षक, आपत्कालीन संस्थेचे स्वयंसेवक आणि सर्पमित्र या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झाले आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख, मंचर प्रांत अधिकारी सारंग कोडोलकर, उपजिल्हाधिकारी संजय तेली, तहसिलदार रमा जोशी, खेड अपर तहसिलदार हरेश सुळ यांनी या प्रशिक्षणास भेट दिली. यावेळी पूर परिस्थितीत अडकलेल्या व्यक्तीचा बचाव व स्थलांतर कसे करावे याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनीदेखील रेस्क्यु बोटमध्ये बसून आपत्कालीन बचाव करण्याचे प्रात्यक्षिक अनुभवले.
या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या १२ दिवसामध्ये आपत्ती, आणीबाणी, प्रथमोपचार, धोका, आपत्तीचे प्रकार, आपत्ती आणि आपत्कालीन व्यवस्थापन, भूकंप, चक्रीवादळ, वीज पडणे, कृत्रिम श्वासोच्छवास आदींबाबत माहिती व प्रशिक्षण देण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारची आपत्ती ओढवल्यास हे प्रशिक्षणार्थी तेथे जावून मदत कार्य करून जिवीत हानी टाळू शकतात.
यावेळी दोन, तीन, चार हातांची बैठक, स्ट्रेचर, अग्निशमन दल कर्मचारी उचल आदी प्रात्यक्षिक घेण्यात आले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे, राहुल पोखरकर, अक्षय चव्हाण, सायली चव्हाण प्रशिक्षणासाठी समन्वयाचे काम करत आहेत.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.