मराठी विश्वकोश हे ज्ञानाच्या लोकशाहीकरणाचे साधन - डॉ. राजा दीक्षित
• महेश आनंदा लोंढे
पुणे : मराठी विश्वकोश हे ज्ञानाच्या लोकशाहीकरणाचे साधन असून मराठी भाषेचे संवर्धन व वृद्धीमध्ये विश्वकोशाचे मोलाचे योगदान असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांनी केले.
मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्यानिमित्त विभागीय माहिती कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'विश्वकोशाची जडणघडण आणि मराठी भाषा' या विषयावर आयोजित व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पुणे विभागीय माहिती उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे, भाषा संचालनालयाचे अधीक्षक सुनील सिरसाट आदी उपस्थित होते.
डॉ. दीक्षित म्हणाले, मराठी विश्वकोश ज्ञानाचे साधन असल्याने निर्मिती प्रक्रियेमध्ये अचूकता आणि गुणवत्तेला महत्व देण्यात येत आहे. लोकशिक्षणाच्या अध्यापनशास्त्रात विश्वकोश हे मोलाचे साधन आहे. विश्वकोश भाषावृद्धी व समृद्धीला हातभार लावतो. परिभाषा व प्रमाणभाषा घडवण्यासाठी मंडळ जाणीवपूर्वक प्रयत्न करते. ग्रामीण भाग, आदिवासी पाडे, लहान बालकांपर्यत विश्वकोश पोहचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मुद्रित आणि संगणकीय माध्यमांचा मेळ घालून ही वाटचाल चालू राहणार आहे.
मराठी विश्वकोशाच्या दुसऱ्या आवृत्तीसाठीचे काम सुरू झाले आहे. नोंदींमध्ये अचूकता व अद्ययावतता आणणे आणि वादग्रस्तता येऊ नये याची काळजी घेणे अशी त्रिसूत्री वापरून, मूळ छापील नोंदी आणि संकेतस्थळावरील नव्या नोंदी एकत्र करून दुसरी विस्तारित आवृत्ती तयार करण्यात येईल. कुमार कोशाचे दोन नवे खंड सुमारे सहा महिन्यांत, तर नवे माहितीपुस्तक येत्या वर्षभरात प्रकाशित करण्याचा प्रयत्न आहे. येत्या काळात बालकोश आणि ऑलिंम्पिक कोशाची निर्मितीही प्रस्तावित आहे.
विश्वकोशाचे कार्य उत्तम रितीने चालावे यासाठी शासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी वाई येथील मराठी विश्वकोश कार्यालयाला भेट देऊन नव्याने अद्ययावत इमारत उभारणार असल्याची घोषणा केली आहे. शासनाच्या पाठिंब्यामुळे अधिक जोमाने कार्य करीत पुढील उपक्रम राबवण्याचा निर्धार डॉ. दीक्षित यांनी व्यक्त केला.
माहिती व तंत्रज्ञानाच्या वेगवान युगात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विश्वकोश वाचकांपर्यत पोहचविण्यात येत आहे. मराठी विश्वकोश २००७ या वर्षी सीडीमध्ये, २०११ मध्ये संकेतस्थळावर, २०१७ मध्ये पेनड्राईव्ह आणि २०१८ मध्ये भ्रमणध्वनी उपयोजकावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. दोन्ही संकेतस्थळांना मिळून सुमारे तीन कोटी वाचकांनी भेट दिली आहे, असेही डॉ. दीक्षित म्हणाले.
डॉ. पाटोदकर म्हणाले, माहिती व जनसपंर्क महासंचालनालयाच्या वतीने शासनाच्या विविध लोककल्याणकारी निर्णयांची, ध्येयधोरणांची, उपक्रमांची माहिती प्रसिद्धीच्या माध्यमातून नागरिकांपर्यत पोहचविण्यात येते. नागरिकांपर्यंत अचूक व वस्तुनिष्ठ माहिती पोहचविण्यासाठी विभाग नेहमीच प्रयत्न करीत आहे. हे काम करीत असताना मराठी भाषेचे अचून ज्ञान असणे फार गरजेचे असून यासाठी मराठी विश्वकोशाचा माहिती व जनसंपर्क विभागाला संदर्भ म्हणून नेहमीच उपयोग होत असतो, असेही ते म्हणाले.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.