केंद्र सरकारनं कापूस आयात केल्यानंच कापसाचे दर कोसळले, असा अंबादास दानवे यांचा आरोप

 

मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं कापूस आयात केल्यानंच कापसाचे दर कोसळले, असा आरोप विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. ते यवतमाळ इथं शेतकऱ्यांची कर्जमाफी, कृषी वीज जोडणी, पीक विमा आदी शेतकऱ्यांच्या मुद्यांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षानं काढलेल्या आक्रोश मोर्चानंतर बातमीदारांशी बोलत होते. संत्री बांग्लादेशात निर्यात होतात आणि तिथं आयात शुल्क 33 टक्क्यावरून 70 टक्के केलं असताना सरकार गप्प आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार हे शेतकरी विरोधी असल्याचं स्पष्ट होतंय, अशी टीका दानवे यांनी केली. 

छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेअंतर्गत वंचित राहिलेल्या १ लाख २८ हजार शेतकऱ्यांना त्वरित कर्जमाफी द्यावी, नियमित पीककर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचं अनुदान त्वरीत मिळावं, २०१८ पासून बंद असलेली कृषी वीज जोडणी योजना त्वरित चालू करावी, या मागण्यांसाठी हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. दानवे आणि शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत ह्यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं.