विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेच्या एकल विद्यापीठासाठी सर्वतोपरी सहकार्य – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 


मुंबई : शंभर वर्षांची मोठी परंपरा लाभलेल्या विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेची एकल विद्यापीठाचा दर्जा मिळवण्याकडे वाटचाल होत आहे. त्यासाठी आवश्यक सर्व बाबींसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.

विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेचा शताब्दी महोत्सवाचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार रामदास तडस, खासदार नवनीत राणा, आमदार प्रवीण पोटे-पाटील, सुलभाताई खोडके, अशोक उईके,  विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय, प्रभारी जिल्हाधिकारी अविष्यांत पंडा, उपविभागीय अधिकारी रिचर्ड यान्थन, प्र. शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, व्हीएमव्ही संस्थेच्या संचालिका डॉ.अंजली देशमुख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, संस्थेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत.  संस्थेचा आजवरचा इतिहास देदीप्यमान आहे. स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणारे अनेक महापुरुष याच महाविद्यालयात घडले. विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवणारी अनेक मोठी व्यक्तिमत्त्व येथे घडली. आपल्या मातोश्रींचे शिक्षण याच संस्थेत झाले. याचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.

कोणत्याही संस्थेसाठी ‘शताब्दी’ ही  ‘इतिश्री’ नसून एक नवीन टप्पा असतो. या संस्थेने एकल महाविद्यालयापर्यंत जाण्याचा मानस ठेवला आहे. संस्थेत विद्यार्थ्यांना आवश्यक सर्व सुविधा उभारल्या जातील. शासनाने यासाठी 25 कोटी रुपये दिले आहेत. संस्थेत विद्यार्थ्यांना आवश्यक सर्व सुविधा उभारल्या जातील. एकल विद्यापीठासाठीही शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. संस्थेने ‘आयकॉनिक संस्था’ म्हणून विकास व्हावा, यासाठी प्रयत्न करावा. या संस्थेला जेव्हा 125 वर्षे पूर्ण होतील, तेव्हा संस्थेचा गौरव केवळ विदर्भात नव्हे तर राज्यभर व्हावा, या दृष्टीने प्रयत्न व्हावा ,असेही ते यावेळी म्हणाले .

श्री  हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ संस्थेलाही अभिमत विद्यापीठाचा दर्जा जाहीर करण्यात आला आहे. रिद्धपुर येथे मराठी विद्यापीठ निर्माण केले जाणार आहे. अमरावती येथे लवकरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येईल . शैक्षणिक हब म्हणून जिल्ह्याचा विकास होत आहे, असेही त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवीन शैक्षणिक धोरण आणले असून ते लवचिक आहे. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात शिकता येईल. भारतीय भाषांमध्ये वैद्यकीय, अभियंत्रिकी शिक्षण घेता येणार आहे. जगात भारताची अर्थव्यवस्था आज पाचव्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था आहे. जागतिकीकरणाच्या युगात रोजगार व स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी नवीन अभ्यासक्रमांची सुरवात करण्यात येणार आहे. भारत हा ‘युवकांचा देश ‘आहे . येथील युवा लोकसंख्येला मानव संसाधनांमध्ये परावर्तित करून विकास साधण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण राबविण्यात येत असल्याचे श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविकात संस्थेच्या संचालिका डॉ.अंजली देशमुख यांनी  संस्थेच्या निर्मितीपासून आजवर झालेल्या प्रगतीची माहिती दिली. स्वातंत्र्यपूर्व काळापासून शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या वऱ्हाडाचे भूषण ठरलेल्या ब्रिटिश काळातील किंग एडवर्ड कॉलेज व सध्याच्या शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेला यंदा शंभर वर्षे पूर्ण होत आहे. या संस्थेची सुरवात लोक वर्गणीतून झाली. या  संस्थेला सन 2021 मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाकडून स्वायत्त दर्जा प्राप्त झाला .संस्थेत आज 22 अभ्यासक्रमांचे सुमारे साडेचार हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत .शताब्दी महोत्सवानिमित्त संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाला आहे. महोत्सवानिमित्त माजी विद्यार्थी मेळाव्याचे ही आयोजनही करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली .

कार्यक्रमाचे संचालन मंजुषा वाठ यांनी तर आभार साधना कोल्हेकर यांनी मानले.

Popular posts
वारकऱ्यांच्या सेवेसाठी जिल्हा प्रशासनाचे ‘आषाढी वारी २०२२’ ॲप
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image