भारत पुढील वर्षी स्वतःचा उष्णता निर्देशांक करणार सुरु

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसंख्येवर होणारा उष्णतेचा परिणाम मोजण्यासाठी आणि त्यावर आधारित उष्णतेच्या लाटेची पूर्व सूचना,  विशिष्ट प्रदेशांना देण्यासाठी, भारत पुढल्या वर्षी आपला स्वतःचा उष्णता निर्देशांक जारी करणार आहे. भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी आज ही माहिती दिली. हवेतली उष्णता निर्धारित करण्यासाठी हवेचं तापमान आणि सापेक्ष आर्द्रता लक्षात घेऊन, हवामान विभागानं गेल्या आठवड्यापासून देशाच्या विविध भागांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर उष्णता निर्देशांक जारी करायला सुरुवात केली आहे, असं ते यावेळी म्हणाले.  

उष्णता आणि आर्द्रता याबरोबर हवामान विभाग वारा आणि उष्णतेचा कालावधी, यासारखे अन्य घटकही यापुढे  लक्षात घेणार असून, उष्णतेचा लोकांवर पडणारा प्रभाव सूचित करण्यासाठी ते महत्वाचे ठरतील, असं ते म्हणाले. पुढल्या वर्षीच्या उन्हाळ्यापर्यंत उष्णता निर्देशांक जारी केला जाईल, आणि  हा निर्देशांक तापमान आणि आर्द्रतेसह वारा आणि वादळाच्या स्थितीची माहिती देईल, अशी माहिती त्यांनी दिली.