भारत आणि अमेरिका यांच्यातील भागीदारी; लोकशाहीच्या भवितव्यासाठी एक चांगलं प्रतीक ठरेल - प्रधानमंत्री
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): भारत आणि अमेरिका यांच्यातली भागीदारी हे लोकशाहीच्या भवितव्यासाठी सुचिन्ह असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. अमेरिकेच्या संसदेला संबोधित करताना त्यांनी सांगितलं, की अमेरिका हा सर्वात जुना, तर भारत हा सर्वात मोठा लोकशाही देश आहे. भारतात प्राचीन काळापासून लोकशाहीची मूल्य रुजलेली आहेत, असं प्रधानमंत्री म्हणाले. बहुपक्षीयतेचं पुनरुज्जीवन आणि बहुपक्षीय संस्थांमध्ये सुधारणा करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली; प्रामुख्यानं संयुक्त राष्ट्र संघटनेत सुधारणा करण्यावर त्यांनी भर दिला.
जग बदलत असताना आपल्या संस्थांमधेही बदल झाला पाहिजे, अन्यथा कसलीही नियम नसलेलं, शत्रुत्वानं भरलेलं जग आपल्याला बघावं लागेल, असं ते म्हणाले. अमेरिकी संसदेत दोनदा भाषण करण्याची अपवादात्मक संधी आपल्याला मिळाली हा मोठा सन्मान आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. भारतात अडीच हजारापेक्षा जास्त राजकीय पक्ष असून, विविध राज्यांमधे सुमारे २० वेगवेगळ्या पक्षांची सत्ता आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ हे धोरण ठेवून भारत सरकार पायाभूत सुविधांचा विकास करत आहे. तंत्रज्ञानात नव्या कल्पना आणि समावेशनावर भारताचा भर आहे, असं ते म्हणाले. पृथ्वी आणि पर्यावरणाविषयी पॅरिस निर्धाराची पूर्तता करणारा भारत हा जी -20 समूहातला एकमेव देश आहे. शाश्वतता ही लोक चळवळ झाली तर जगाला शून्य कार्बन उत्सर्जनाचं उद्दिष्ट लवकर गाठता येईल, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. दहशतवाद हा मानवतेचा शत्रू आहे, त्याचा सामना करताना कोणतेही पण-परंतु आड येता कामा नयेत, असं मोदी म्हणाले.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.