किरकोळ दरांवर आधारित चलनवाढ रोखण्यासाठी गहू आणि तांदळाचा ई-लिलाव करण्याचे केंद्र सरकारचे भारतीय अन्न महामंडळाला निर्देश

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : किरकोळ दरांमधली चलनवाढ रोखण्यासाठी गहू आणि तांदूळाचा ई-लिलाव करण्याचे निर्देश, केंद्र सरकारनं भारतीय अन्न महामंडळ- एफ सी आय ला दिले आहेत.  एफ सी आय चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अशोक मीणा यांनी काल नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. योग्य आणि सरासरी दर्जाच्या गव्हाची आधारभूत किंमत २ हजार १५० रुपये प्रति क्विंटल, तर साधारण गव्हासाठी २ हजार १२५ रुपये प्रति क्विंटल ठेवण्यात आली आहे, तर स्थानिक खुल्या बाजार विक्री योजने अंतर्गत तांदळाचा ई-लिलाव पुढील महिन्याच्या ५ तारखेपासून सुरू होईल, तांदळाची आधारभूत किंमत ३ हजार १०० रुपये प्रतिक्विंटल आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

गव्हाच्या साठेबाजीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारनं, लिलावात सहभागी होण्याकरता गहू साठ्याच्या माहितीसाठी तयार केलेल्या पोर्टलवर तशी घोषणा करणं अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे, व्यापारी आणि इतर संबंधितांची वैधता तपासण्यासाठी, वैध FSSAI परवाना देखील, सहभागासाठी अनिवार्य करण्यात आला आहे, असंही त्यांनी सांगितलं. या ई-लिलावामध्ये खरेदीदार जास्तीत जास्त १०० मेट्रीक टनांपर्यंत बोली लावू शकतो. छोट्या प्रमाणात गहू प्रक्रिया करणारे आणि व्यापारी यांना सामावून घेण्यासाठी,बोलीसाठी  किमान प्रमाण १० मेट्रीक टन ठेवण्यात आलं आहे.